गुलमोहर रस्त्यावर पथदिवे बसवण्यासाठी नागरिकांनी टेंभा आंदोलन करत केला मनपा प्रशासनाचा निषेध
तातडीने पथदिवे बसविले नाही तर तीव्र आंदोलन करू – नगरसेवक रामदास आंधळे
नगर : शहरातील गुलमोहर रस्स्त्यावर गेल्या दीड वर्षांपूर्वी गुलमोहर रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा पथदिव्यांचे खांब काढून टाकले. पण हे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा पथदिवे बसवणे अपेक्षित असताना मनपा प्रशासनाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले, आणि तेव्हा पासून येथील नागरिकांना अंधाराचा सामना करत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, या रस्त्यावर अंधार असल्याने मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रात्री फिरणाऱ्या टवाळखोर पोरांमुळे महिलांना या रस्त्यावरून जाण्याची भीती वाटते, ज्येष्ठ नागरिकांना अंधारातच मॉर्निंग वॉक करावा लागतो. त्यातच शहरातील गुलमोहर रस्ता वर्दळीचा असून या ठिकाणी सतत वाहतूक सुरु असते पण अंधारात येथून प्रवास करताना छोटे मोठे अपघत देखील होतात गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेने पथदिवे न बसविल्याने खांब रोवून दिवे बसवावे याबाबत मनपाला वारंवार निवेदन दिले. मात्र, मनपा प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. तरी या ठिकाणी तातडीने पथदिवे बसविले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा नगरसेवक रामदास आंधळे यांनी दिला आहे.
गुलमोहर रस्स्त्यावर गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेने पथदिवे न बसविल्याने संतप्त नागरिकांनी या रस्त्यावरील पारिजात चौकात अंधार हटवा, दिवे लावा, अशा घोषणा देत टेंभा आंदोलन करून मनपा प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनात नगरसेवक रामदास आंधळे, बाळासाहेब सोनवणे, शिरीष जानवे, कुमार नवले, अॅड. लक्ष्मीकांत पटारे, आकाश सोनवणे, मनोहर भाकरे, महेश घावटे, कौशिक रसाळ, महेश कुलकर्णी, प्रदीप घोडके, राहुल आंधळे, प्रमोद कुलकर्णी, अविनाश बडे, किशोर उबाळे, रमेश सोनवणे आदी सहभागी झाले होते.