आयटी पार्क प्रकरणी किरण काळेंवर दाखल विनयभंग प्रकरणी तपासातून धक्कादायक माहिती आली समोर ;
मला आयुष्यातून उध्वस्त करण्याच गलिच्छ पुढाऱ्याच षडयंत्र – जिल्हाध्यक्ष काळे
तथागतीत चावला हल्ला प्रकरणातही गोवण्याचे माझ्याविरुद्ध षडयंत्र
————————————————————-
प्रतिनिधी : सप्टेंबर २०२१ मध्ये एमआयडीसीतील तथाकथित आयटी पार्क असल्याचा दावा करत त्याचा भांडाफोड शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ईन कॅमेरा केला होता. मात्र यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ३ सप्टेंबर २०२१ च्या रात्री उशिरा एका महिलेने आयटी पार्कच्या वास्तूमध्ये काळेंनी आपला विनयभंग केल्याची फिर्याद दिल्यावरून भादवि कलम ३५४, ४५२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी सखोल तपास केला आहे. यातून मात्र धक्कादायक माहिती समोर आली असून सदर गुन्हा हा खोटा असून घडल्याच नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मला आयुष्यातून उध्वस्त करण्याचा शहरातील तथाकथित कार्यसम्राट गलिच्छ पुढार्याच षडयंत्र असल्याची खंत किरण काळे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत काळे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे माध्यमांना पोलीस तपासा बाबतची कागदपत्रे उपलब्ध करून देत आपल्या उद्विग्न भावना मांडल्या आहेत. काळे म्हणाले, प्रचंड मनाला वेदना देणारी ही गोष्ट आहे. मी संवेदनशील मनाचा व्यक्ती आहे. खोट्याची मला चीड येते. या खोट्या आरोपामुळे मी अनेक रात्री झोपू शकलो नव्हतो. मी शहरातील हजारो तरुण, त्यांच्या पालकांची आयटी पार्क प्रकरणात शहरातील राजकीय नेतृत्वा नेफसवणूक केली. माझ्याकडे ते आले म्हणून या विषयातील सत्य मी या शहरा समोर आणलं. त्याचा बक्षीस म्हणून एका भगिनीला पुढे करून माझ्यावर खोटा विनयभंगासारखा चारित्र्य हनन करणारा गुन्हा दाखल केला. माझी माता-भगिनींमधील जनमानसातील स्वच्छ प्रतिमा मलीन करण्याचे कटकारस्थान रचल गेलं.
काळे म्हणाले, लहानपणी आईने मला जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांच्या गोष्टी सांगितल्या. अशा महान कार्य केलेल्या महिला या माझ्या आदर्श आहेत. कोणत्याही भगिनीकडे अशा वाईट नजरेने पाहण्याचा माझ्यावर संस्कार नाही. पण केवळ राजकीय आकसापोटी मला आयुष्यातूनच उठवण्याचा डाव आखला गेला, याची खंत मला वाटते. काळे याबाबत माहिती देताना म्हणाले, पोलिसांनी २८ एप्रिल २०२२ मध्येच याबाबतचा तपास पूर्ण करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयामध्ये गुन्हा घडलाच नाही असे नमूद करत अंतिम अहवाल सादर केला आहे. या तपासात मूळ फिर्यादीसह बावीस जणांचे जबाब नोंदवले आहेत. पोलीस तपासात काळे यांना निर्दोष करताना पोलिसांनी तपासातील महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयासमोर नोंदवली आहेत.
त्यात म्हटले आहे की फिर्यादी यांचा हात काळे यांनी धरला नाही. शिवीगाळ, दमदाटी केलेली नाही. तसे जबाब प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, महिलांनी दिले आहेत. काळे आणि त्यांचे सहकारी बळजबरीने आयटी पार्कमध्ये घुसलेले नसल्याचे जप्त करण्यात आलेला सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट दिसत असून त्यांना कोणीही अडवलेले नव्हते. कंपनीतील लोकांना विचारपूस करत ते शांततेत बाहेर आले आहेत. फिर्यादीचा असणाऱ्या गाळा हा फिर्यादीच्या कंपनीच्या नावे नसून तो अनधिकृतपणे पोटभाडेकरू असल्याचे एमआयडीसीच्या क्षेत्र व्यवस्थापकांनी दिलेल्या लेखी पत्रावरून स्पष्ट झाले आहे. फिर्यादीला स्वतःच्या कंपनीचे शॉप ॲक्ट आणि कंपनी जागा मालकी बाबतचे कागदपत्र सादर करण्यासाठी सीआरपीसी ९१ प्रमाणे नोटीसची बजावणी करून देखील त्यांनी कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही.
घटनास्थळी फिर्यादी नव्हतीच, रचला बनाव :
पोलिसांनी तपासात महत्त्वपूर्ण बाब समोर असताना अहवालात म्हटले आहे की, फिर्यादी या काळे व त्यांचे सहकारी येण्यापूर्वी त्यांच्या कंपनीत हजरच नव्हत्या. त्यांच्याच कंपनीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असतात त्यामध्ये फिर्यादी या स्वतः दिसतच नाहीत. पोलिसांनी काळे आणि फिर्यादी यांचे सीडीआर व एसडीआरसह टॉवर लोकेशन तपासले आहे. त्यामध्ये काळे हे आयटी पार्क मध्ये दिसत असून फिर्यादी हे आयटी पार्कच्या तथाकथित विनयभंगाची घटना घडल्याच्या ठिकाणी उपस्थितच नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी फिर्यादीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्यात म्हटले आहे की, सदर गुन्ह्यातील आरोपी किरण काळे यांनी सदर गुन्हा केलेला नसून फिर्यादी यांनी द्वेष भावनेने काळे यांना त्रास होण्याच्या उद्देशाने सदरची खोटी फिर्याद दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्याची ‘ ब ‘ वर्गात वर्गवारी होऊन त्याची ब वर्ग समरी मंजूर होण्यास न्यायालयाला विनंती केली आहे. तसेच फिर्यादी यांनी खोटी फिर्याद देऊन पोलिस यंत्रणेचा अपव्य केला म्हणून त्यांच्याविरुद्ध भादविक १८२ व २११ प्रमाणे कायदाचा दुरुपयोग केल्याबद्दल पुढील कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी पोलिसांनी मेहरबान न्यायालयाकडे मागितली असल्याची कागदपत्रे काळे यांनी प्रसार माध्यमां सामोरं उघड केली आहेत.
शहर लोकप्रतिनिधींनी नीच राजकारण केले :
किरण काळे यांनी शहर लोकप्रतिनिधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले तुम्ही तर आयटी पार्क केल्याचा बनावच रचला. मात्र तो मी उघड केला म्हणून माझं चारित्र्य हनन केलं. शेवटी सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. वास्तव समोर आल आहे. माझ्या शहरातल्या तरुणांची तुम्ही केलेली फसवणूक निंदाजनक आहे. तुम्हाला माझा राग आहे. तुम्ही माझा व्यक्तिद्वेष करता. म्हणूनच तुम्ही मला वारंवार खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे सातत्याने षडयंत्र रचता. खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी त्या भगिनीला घेउन पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. आताही चावला हल्ला प्रकरणात असाच प्रकार सुरू आहे.
मी तुम्हाला घाबरत नाही :
शहर लोकप्रतिनिधींना इशारा देताना काळे, मी तुमच्या षडयंत्रांना भीक घालत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. नगरकरांनी देखील यांना अजिबात घाबरू नये. मी तुमच्या या दुष्कृत्यांचा निर्भीडपणे निधड्या छातीने आजवर सामना केला आहे. उद्याही करत राहणार. तुमच्या या चुकीच्या नेतृत्वामुळे माझ्यासह शहरातील अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. शहराला गुन्हेगारीच्या विळख्यातून मुक्त करत एक शांत, सुंदर, विकसित, व्यापार, उद्योग भरभराटी असणार, या शहरातल्या तरुणांना या शहरातच चांगला रोजगार देऊ शकणार, विकासाचे व्हिजन घेऊन हे शहर घडवण्याचं स्वप्न म उराशी बाळगून अहोरात्र काम करत आहे. ते नगरकरांच्या पाठिंबांनी पूर्ण करण्यासाठी आजपासून अधिक तीव्र संघर्ष मी करणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले आहे.
चावला प्रकरणात देखील षडयंत्र :
दरम्यान, किरण काळे यांच्यासह शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची समक्ष भेट घेऊन विविज्ञ चावला यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे देखील उपस्थित होते. याही प्रकरणात मला षडयंत्र करून गोवले जात असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. पोलीस सांगतील तेव्हा पोलिसांसमोर हजर होईल. तपास कामी पूर्ण सहकार्य करेल. कुठेही पळून जाणार नाही. मी कोणताही अग्नी परीक्षेसाठी तयार आहे. याप्रकरणी मला अटक झाली तर काँग्रेसचा माझा कोणताही कार्यकर्ता पोलीस स्टेशन अथवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार नाही असे काळे यांनी म्हटले आहे. राजकारणात विरोध जरूर असावा. तो वैचारिक असावा. मात्र कुणाला खोट्या, नाट्या केसेस मध्ये अडकवून आयुष्यातून उध्वस्त करण्याची राक्षसी प्रवृत्ती ही शहरासाठी घातक असल्याची उद्विग्न भावना काळे यांनी व्यक्त केली आहे.