अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासक पदी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांची नियुक्ती शासनाचे आदेश
प्रशासक पदाची सूत्रे हाती घेताच सर्व विभागाची पाहणी करून झाडाझडती
नगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासक पदाची सूत्रे शासन निर्देशानुसार डॉ. पंकज जावळे यांच्याकडे देण्यात आले आहेत. या प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतात आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या सर्व विभागांना भेटी देऊन विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना आपापली प्रशासकीय कर्तव्य तत्परतेने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
यावेळी डॉ. जावळे यांनी सर्व युवा प्रमुखांना आपापला विभाग व मनपा मुख्य इमारत स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती मागवून विभागात असलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची देखील माहिती संकलित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. कामचुकार व निर्देशांचे अनुपालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही डॉ. जावळे यांनी दिले आहेत. महानगरपालिकेत आता प्रशासक राज्य सुरू झाले असल्याने प्रशासक म्हणून महापालिका प्रशासनाचे सर्व अधिकार आयुक्त डॉ. जावळे यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त डॉ.जावळे यांची जबाबदारी वाढली आहे प्रशासक पदाच्या कालावधीमध्ये शहराचे अनेक प्रश्न ते कसे हाताळतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे