अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे चावला हाफ मर्डर बनावाचा मास्टर माईंड – किरण काळे
संजय झिंजे यांच्या हत्येचा कट शिजवला जात आहे, काँग्रेसचा गंभीर आरोप
अहमदनगर प्रतिनिधी : हर्षद चावला याच्यावर कोणीही हल्ला केलेला नाही. हाफ मर्डरचा केवळ बनाव रचला आहे. चावला हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. या बनावाचा खरा मास्टरमाईंड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे आहे. खोसेला मुख्य आरोपी करून तात्काळ त्याच्यावर भा. द. वि. १२० ब प्रमाणे कटकारस्थान, षडयंत्र रचल्याचा गुन्हा दाखल करून अटक करावी. तसेच या बनाव प्रकरणात राष्ट्रवादी कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, कार्यकर्ता सुरज जाधव, सचिन दगडे यांना देखील आरोपी करण्यात यावे, अशी मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांच्या हत्येचा कट शिजवला जात आहे. त्यासाठीच त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी चावला सातत्याने राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी संजय झिंजे, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, अलतमश जरीवाला, विकास भिंगारदिवे, किशोर कोतकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसने पत्र परिषदेत चावला याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मदत करतानाचे सिव्हील हॉस्पिटल येथील माहिती अधिकारात मिळालेले सीसीटीव्ही फुटेज दाखवत गंभीर आरोप केले आहेत. काळे म्हणाले, गुन्हा घडलेलाच नाही. खोसे व चावला यांनी संगनमत करत खून करण्याच्या दृष्टीने हल्ला झाल्याचा बनाव करत कट शिजवला होता. यासाठी प्लॅनिंग केले गेले. त्याकरिता दिवस, वेळ, जागा निश्चित केली गेली. आम्ही हल्लेखोर पाठवत चावला याला संपवून टाका, काटा काढा, सोडू नका, जिवे मारून टाका असे म्हणत मला आणि झिंजे यांना गोवण्याचा कट शिजला. आधी तीन लोकांना आरोपी करण्यात आले त्यांच्या तोंडी आमच्या नावे घातली गेली. नंतर पोलीस तपासात आमच्यावर १२० ब प्रमाणे कट रचल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र कोतवाली पोलीस स्टेशनच्या काही लोकांना हाताशी धरून रचण्यात आले. ज्या तिघांना पोलिसांनी आरोपी केले आहे त्या तिघांनीही हल्ला केला नसल्याचे स्पष्ट करत आपल्याजवळ तसे पुरावे असल्याचे म्हटले आहे. याकडे काळे यांनी लक्ष वेधले. कोतवाली निरीक्षकांकडे लेखी अर्ज, समक्ष भेट, फोन, पाठपुरावा करुन एफआयआरची प्रत मागितली. आम्हाला ती सुध्दा दिली नसल्याचा आरोप काळेंनी केला.