आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. लोकसभांच्या दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असून मतदार संघांवर दावे- प्रतिदावे केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारही लोकसभेच्या निवडणूकीत उतरणार असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी केला आहे.
5 डिसेंबर 2023 रोजी अमरावती येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला रोहित पवार यांनी स्वतः पक्षाची बैठक बोलावली होती. त्या ठिकाणी भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील अध्यक्ष म्हणून किरण अतकरी आणि सौरभ रोकडे त्या ठिकाणी उपस्थित होतो. यावेळी रोहित पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याचे किरण अतकरी यांनी सांगितले आहे.
रोहित पवार यांनी भंडारा- गोंदिया जिल्ह्याची राजकीय परिस्थितीची पूर्ण माहिती विचारली. त्यानंतर बूथ कमिट्या तुम्ही तयार ठेवा, आपल्याला कोणत्यही परिस्थितीत निवडणूक लढायची आहे… अशा सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच जर रोहित पवार यांनी भंडारा- गोंदिया लोकसभा लढवली तर दुर्लक्षित भंडारा जिल्ह्याचा बारामती झाल्याशिवाय राहणार नाही.. असेही किरण अतकरी म्हणाले. दरम्यान, 3,4 जानेवारी 2024 ला शिर्डी येथे राष्ट्रवादीचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या शिबिरामध्ये सुद्धा भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून लोकसभा लढावी अशी आमची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.