अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक कामाला लागले आहेत. अशात राज्यातील काही महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या नावांची देखील वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहे. अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सुप्रिया सुळे यंदा अहमदनगर जिल्ह्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहे. दरम्यान, याच चर्चांवर अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “प्रतिस्पर्धी कुणीही असला तरी निवडणुकीला सामोरे जात असताना सुज्ञ जनता मोदींच्याच पाठीशी उभा राहील” असे विखे म्हणाले आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार सुजय विखेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरद पवार गट) त्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदारसंघात चाचपणी देखील सुरू झाली आहे. मात्र, सुजय विखे यांनी देखील जनतेचा मोदींच्या कामावर विश्वास असल्याचे सांगत प्रतिस्पर्धी कुणीही असला तरी निवडणुकीला सामोरे जात असताना सुज्ञ जनता मोदींच्याच पाठीशी उभा राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, हा विश्वास व्यक्त करत असतांना खासदार विखे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर बोलणं टाळलं आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील एण्ट्रीच्या चर्चेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.