अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार – अजित पवारांची घोषणा
मुंबई : राज्यातील पर्यटकांना व भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सेवा पुरवण्यासाठी श्रीनगर ( जम्मू-काश्मीर) आणि श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने अतिशय मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतल्या आहेत. या जागांसाठी 77 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे, असे ते म्हणाले. तसेच कोकण विभागात पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गड-किल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन करण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचन करून अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात केली. पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. राज्यातील 11 गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.