अमोल कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी भाजप आमदाराने दंड थोपटले; म्हणाले, शिरूरमध्ये…
पुणे : महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चित असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ… राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ. अमोल कोल्हे या मतदारसंघातून खासदार आहेत. शरद पवार गटाकडून कोल्हे यांनाच या मतदारसंघातून तिकीट दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी महायुतीतील नेते दंड थोपटताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे अमोल कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात असतानाच आता भाजप नेत्यानेही शिरूर लोकसभा लढण्याचे संकेत दिलेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघातुन कोल्हे यांच्याविरोधात मैदानात कोण उतरणार? अशी चर्चा रंगत असताना आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपाकडून निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. बुथ कमिटी संमेलनाच्या सभेत त्यांनी तसे संकेत दिलेत. महेश लांडगे चाकण येथील भाजपाच्या सभेत बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना महेश लांडगे यांनी हे वक्तव्य केलंय. शिरुर लोकसभा मतदार संघावर अजित पवार गटाने दावा केलेला आहे. असं असतानाच आता शिरुरमधून भाजपाचा उमेदवार असावा, अशी अपेक्षा आमदार महेश लांडगे यांनी व्यक् केली आहे. राज्यातल्या 48 लोकसभेत शिरुर हा 36 नंबरचा मतदारसंघ आहे आणि हा आकडा माझ्यासाठी लकी आहे. 36 नंबरच्या शिरुर लोकसभा मतदारांची बेरीज 9 तर माझी जन्मतारीखीची बेरीज 9 असा माझ्यासाठी लकी आहे, असं म्हणत महेश लांडगे यांनी शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अमोल कोल्हे यांच्या विरोधातील उमेदवार निवडून आणणार असल्याचं चॅलेंज अजित पवार यांनी दिलं आहे. ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अशात अनेक नेते फिल्डिंग लावताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटीलही या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी अजित पवार गटात जाण्याचीही त्यांची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अशात आता अमोल कोल्हे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्वाचं असेल.