अल्पवयीन मुलीच्या हत्येनं शहरात खळबळ, खुनी समोर आल्यावर गावकरीच हादरले… कोण होती ती व्यक्ती ?
रांची : आपल्या मुलांचं भलं व्हावं असं सर्व पालकांना वाटतं, त्यासाठी प्रसंगी ते कठोरही वागतात. पण काही वेळा हाच कठोरपणा जीवघेणाही ठरू शकतो. अशीच धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. तेथे एका अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. पोलिसांना या गोष्टीची कुणकुण लागताच त्यांनी तो मृतदेह बाहेर काढून खुनाचा तपास करायला सुरूवात केली. मात्र त्या दरम्यान जी माहिती समोर आली ती ऐकीन सर्वांनाच धक्का बसला. त्या अल्पवयीन मुलीच्या हत्येसाठी दुसरं-तिसरं कोणी जबाबदार नव्हतं, तर खुद्द तिच्या जन्मदात्या पित्यानेच तिचा मारहाण करून जीव घेतल्याचे उघड झाले. हे ऐकून गावकऱ्यांना एकच धक्का बसला, सर्वत्र खळबळ माजली. तीन दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आलं आणि पोलिसांनी चौघांना अटक केली. पण तो नराधम पिता अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील एका गावात ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पीटीआयला माहिती देत सांगितलं की त्या मुलीच्या मृतदेहाची अवस्था पाहून तिची हत्या तीन दिवसांपूर्वी झाली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. त्या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टम मेदिनीराय मेडिकल कॉलेज रुग्णालयात (एमएमसीएच) पाठवण्यात आला. पोलिस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघत आहेत.
याप्रकरणी आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या जबानीनुसार, या नृशंस कृत्यासाठी तिचे वडीलच जबाबदार आहेत. पण ते अद्यापही फरार असून पोलिस कसून शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी ही घरी नव्हती, ते पाहून तिचे वडील चांगले भडकले. ती घरी आल्यानंतर त्यांनी तिच्याशी वाद घालायला सुरूवात केली. भांडण वाढतच गेलं आणि दारूच्या नशेत असलेल्या संतप्त आरोपीने रागाच्या भरात मुलीला एवढी जबर मारहाण केली की मुलीचा जीवच गेला. त्यानंतर आरोपी पित्याने गावातील ओळखीच्या तीन-चार लोकांना बोलावून मृतदेह दफन केला. अखेर हे प्रकरण आता समोर आले असून पोलिस आरोपी पित्याचा कसून शोध घेत आहेत.