प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत… वेळ मागितला म्हणून राग आला, त्याने थेट…
टिटवाळा : पती-पत्नीचं नातं म्हणजे प्रेम आणि विश्वासाचं. पण हे नातं जपण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी वेळही द्यावा लागतो. पण जर वेळच नसेल तर ? आणि तो वेळ मागणंच जीवावर बेतत असेल तर ? अशाच प्रकारची एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना टिटवाळा येथे घडली. प्रेमविवाह करून घरी आणलेल्या बायकोची, तिच्याच पतीने क्रूरपणे हत्या केली, एवढंच नव्हे तर नंतर अत्यंत थंड डोक्याने पत्नीच्या आत्महत्येचा बनावही त्याने रचला. आणि हे सगळं का ? तर, पत्नीने फक्त थोडासा वेळ मागितला म्हणून.. एवढ्याशा कारणावरून त्याने आयुष्यभराच्या जोडीदारालाच संपवलं. आणि बेमालूमपणे आत्महत्येचा बनावही रचला. पण त्याचा हा बनाव अखेर उघडकीस आलाच आणि पोलिसांनी तपास करून अवघ्या 2 तासांत हत्या करणाऱ्या पतीचा पर्दाफाश करत बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा परिसरातील आनेगाव ही दुर्दैवी पण तितकीच खळबळजनक घटना घडली. महेश मोहपे, असे आरोपी पतीचे नाव आहे. तर दीपा असे मृत महिलेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे महेशने त्याची पत्नी दीपा हिची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मुलीच्या मृत्यूची बातमी कळल्यावर तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण नंतर मयत दीपा हिच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालत याबाबत टिटवाळा पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करत अवघ्या दोन तासात महेशच्या बनावाचा पर्दाफाश करत त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या माहिती नुसार महेश आणि दिपाचा प्रेमविवाह झाला होता. महेश वेळ देत नाही, असा तगादा त्याची पत्नी दीपा लावत असे, त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. घटनेच्या दिवशीदेखील दोघांमध्ये असाच वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या महेशने गळा आवळून दिपाची हत्या केली. नंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या सर्व गोष्टी पोलीस तपासात उघड झाल्या. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत महेश मोहपे याला बेड्या ठोकत पुढील तपास सुरु केला आहे.