नगरच्या महिलेची कायगाव टोका येथे पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या : पहा काय आहे प्रकरण…
अहमदनगर – संपत्तीच्या वादातून जवळच्या व्यक्तींनीच महिलेचा छळ केल्याने तिने कायगाव टोका (ता. नेवासा) येथे पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. मयत महिला येथील सावेडीतील शिवनगर परिसरात राहत होती. याप्रकरणी चौघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेच्या मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
बाळासाहेब पांडुरंग चेमटे, मनिषा बाळासाहेब चेमटे, सुमन रघुनाथ खांदवे व पांडुरंग चेमटे (सर्व रा. शिवनगर, सावेडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेचे पती जिल्हा सहकारी बँकेत कॅशिअर म्हणून नोकरी करत होते. त्यांचे सन २०२१ मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने पत्नीला पैसे मिळाले होते. पैसे मिळाल्याने संशयित चौघे आरोपी महिलेशी नेहमी संपत्तीच्या वादातून भांडत होते. त्यांच्या नावावर असलेल्या संपत्तीत निम्मा हिस्सा मागत होते. बाळासाहेब चेमटे याने महिलेसोबत गैरवर्तन केले होते. याच कारणातून महिलेने सोमवारी (दि. १८) फिर्यादी पुणे येथे असताना त्यांना फोन करून याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्या घरातून निघून गेल्या होत्या. घरातून गेल्यानंतर त्यांनी कायगाव टोका येथे आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. १९) पहाटे दोनच्या सुमारास उघडकीस आली. महिलेने लिहून ठेवलेली चिठ्ठी घरात मिळून आली आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.