अहमदनगर तालुका हादरला : पतीनेच चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळलं, आरोपी अटक.
अहमदनगर : तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे खळबळजनक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून नराधमाने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले. सुनील लांडगे (वय – 45) असे आरोपीचे नाव आहे. तर लिलाबाई लांडगे (वय – 35), साक्षी लांडगे (वय – 13) आणि खुशी लांडगे (वय – 14) अशी मृतांची नावे आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केली असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. यावरून दोघांमध्ये अनेकदा खटकेही उडत होते. मात्र सोमवारी सकाळी हा वाद टोकाला पोहोचला आणि आरोपीने पत्नीसह मुलींच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना पेटवून दिले.
घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीते यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पेट्रोल-रॉकेलचा सम्रिश्र वास येत होता. ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून पेटवून दिल्याने तिघी जणी होरपळल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.