रक्तदान करून केजरीवालांच्या अटकेचा नेवाशात निषेध.
नेवासा (प्रतिनिधी) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर इडी मार्फत करण्यात आलेल्या बेकायदेशीर अटकेच्या कारवाईचा नेवासा आम् आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.
केजरीवाल यांच्या अटकेचे नेवासा तालुक्यात जोरदार पडसाद उमटले आहेत. यापूर्वी याच घटनेचा निषेध म्हणून आप कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या तालुक्यातील शिरसगाव येथील निवासस्थानासमोर होळीचे औचित्य साधून केलेले बोंबाबोंब आंदोलन लक्षवेधी ठरले होते. त्यानंतर गुरुवारी ‘आप’चे नेवासा शहर अध्यक्ष संदीप आलवणे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नेवासा फाट्यावरील डॉ.निलेश लोखंडे यांच्या प्रायमस हॉस्पिटलमध्ये आप कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मोदी सरकारच्या राजकीय सूड चक्राच्या राजकारणाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी नेवासा ‘आप’चे ॲड. सादिक शिलेदार, प्रवीण तिरोडकर, सलीम सय्यद, देवराम सरोदे, किरण भालेराव, करीम सय्यद, कुणाल मांडण, प्रवीण खरात, प्रीतम सोनकांबळे, आदींसह तालुक्याच्या विविध भागांतून कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.