येणा-या स सर्वच निवडणुकांसाठी एकत्र मंत्री विखे पाटील आणि आ. शिंदेची ग्वाही
जामखेड : माझ्या आणि आ.राम शिंदे यांच्या मध्ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नसुन यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रित येवून एक विचाराने लढविणार आहोत. अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. व माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे यांनी आज जामखेड शहरातील चुंभळी येथील जाहीर सभेत दिली.
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने शहरातील जामवाडी, तपनेश्वर, मुख्य बाजारपेठ, शिवाजी नगर, संताजी नगर, सदाफुले वस्ती, आरोळे वस्ती आणि चुंभळी येथे नागरीकांच्या भेटी घेवून संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहीती देवून महायुतीच्या उमेदवाराला खंबीरपणे साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री आ.राम शिंदे, शिवसेना नेते बाबुशेठ टायरवाले, भाजपा नेते विनायकराव देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
चुंभळी येथील कार्यक्रम सुरु होताच, उपस्थितांनी आ.राम शिंदे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा प्रश्न उपस्थित केला. आ.शिंदे यांनीच या चर्चेत हस्तक्षेप करुन,” मंत्री विखे पाटील आणि माझ्यामध्ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नाहीत. आपल्याला आता महायुतीच्याच उमेदवाराचे काम करायचे आहे. या भागातून शंभर टक्के मतदान हे महायुतीच्या उमेदवारालाच होईल, असे काम करायचे आहे .” असे सांगून त्यांनी हा विषय संपविला.
याच विषयाचा उल्लेख करुन, मंत्री ना. विखे पाटील यांनीही चुंभळी येथील श्री.मस्कोबा महाराजांच्या देवस्थानाचा उल्लेख करुन, आमच्या लोणी बुद्रूक गावाचे ग्रामदैवत सुध्दा म्हसोबा महाराज आहेत. या देवस्थानांच्या साक्षीने सांगतो की, “आमच्या दोघांमध्ये आता कोणतेही मतभेद नाहीत. यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रितपणेच लढविणार आहोत. याबाबत कुणीही मनात संभ्रम ठेवु नये.”