लिंगायत महीला भगनीकडून बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी | नातेपुते
महात्मा बसवेश्वर हे आद्य समाज सुधारक होते. आठशे वर्षांपूर्वी बसवेश्वरांनी मानवतावादी कार्याचा प्रारंभ केला.मध्ययुगातच त्यांनी समता,स्वातंत्र्य, बंधुता ,अहिंसा ,सामाजिक न्याय ,सामाजिक संकल्पनांचा एक व्यापक अविष्कार त्यांनी घडवलेला आहे. महात्मा बसवेश्वर हे लिंगायत धर्माचे प्रेषित आहेत. कर्नाटकातील कल्याण राज्याचे ते पंतप्रधान होते. धर्म प्रेषित, धर्म तत्त्वज्ञ,अर्थतज्ञ, राजकारणी, संत ,महाकवी, समतावादी ,विश्वगुरू, जगत ज्योती असे सागर स्वरूपी व्यक्तिमत्व बसवेश्वरांचे होते.समाज जीवनाच्या सर्व अंगांना जवळून स्पर्श करणारे अद्भुत असे कार्य बसवेश्वरांनी केले.
नातेपुते येथील निलांबिका लिंगायत महिला मंचच्या वतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रथमतः नीलांबिका लिंगायत महिला मंचच्या अध्यक्षा श्री व सौ उमा होडगे व श्री व सौ स्नेहल डोंबे यांच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले . या वेळी बसवेश्वर युवा मंच,वीरशैव लिंगायत समाज संघटना व निलंबिका लिंगायत महिलांचे वतीने नातेपुते येथील विठ्ठल मंदिरा समोर वृक्षारोपण करण्यात आले.तसेच समाजातील बालगोपाळांनी पोवाडा, नृत्य अविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.त्यांना महिला मंचच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.
या वेळी वीरशैव लिंगायत समाज संघटनेचे अध्यक्ष महेश शेटे, शशिकांत कल्याणी ,संदीप गटकुळ, बाळासाहेब तवटे ,चंद्रशेखर शेटे ,अमोल नायकुले, प्रशांत कथले, शशी होडगे, योगेश डोंबे ,योगेश लाटणेकर ,अभिजीत महामने आदींसह समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कडबाने यांनी केले तर आभार अभिजीत म्हामणे यांनी केले.