घाटकोपर येथील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट
मुंबईतील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज हटवणार
दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर
मुंबई (घाटकोपर) :- पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेले होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना, झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. मुंबईतील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अशी होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दुर्घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले असून हायड्रा आणि क्रेनच्या मदतीने हे होर्डिंग हटविण्याचे काम सूरु आहे. आतापर्यंत 57 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून शासनाच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच या दुर्घटनेतील जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील तसेच आशा घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.