अंबाजोगाई शहरातील स्वच्छता, रस्ते व पाणी पुरवठा नियमित करा :- राजकिशोर मोदी
अंबाजोगाई(प्रतिनिधी):-
अंबाजोगाई शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करणे तथा शहरात अतिशय संथ गतीने होत असलेली रस्त्याची कामे तात्काळ पूर्ण करून नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाला आलेली मरगळ दुर करून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न तात्काळ मिटवावा व होणारी नागरिकांची गैरसोय टाळावी या मागणीचे निवेदन तहसीलदार तथा मुख्य प्रशासक नगर परिषद अंबाजोगाई यांना राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आज देण्यात आले. मागील एक ते दोन महिन्यांपासून अंबाजोगाई शहराला होणार पाणी पुरवठा पुर्णपणे विस्कळीत झाला आहे. पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे याचा नाहक त्रास अंबाजोगाई शहर वासीयांना होत आहे.अनेक सामान्य नागरिकांना पाणी विकत घेण्याची पाळी येऊ लागली आहे.यामुळे सामान्य नागरिकांना विनाकारण आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तेव्हा तहसीलदार , प्रशासक नगर परिषद अंबाजोगाई यांनी याकडे जातीने लक्ष घालून अंबाजोगाई करांची पाण्याविना होणारी फरफट थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे राजकिशोर मोदी यांनी केली आहे. त्याचबरोबर अंबाजोगाई शहरात मागील काही महिन्यांपासून रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. सुरू असलेली कामे अतिशय संथ गतीने चालू आहेत. या कासव गतीच्या कामामुळे देखिल नागरिक त्रस्त झाले आहेत. तेव्हा शहरात संथ गतीने होत असलेली रस्त्याची कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी संबंधित एजन्सीला आदेशीत करावे. तसेच नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे देखील शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी घाण दिसून येत आहे. यावरही संबंधित विभागास तात्काळ स्वच्छते विषयी आदेशीत करून अंबाजोगाई वासीयांच्या मूलभूत प्रश्नांकडे विनाविलंब लक्ष द्यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे राजकिशोर मोदी यांनी समस्त अंबाजोगाई वासीयांच्या वतीने करण्यात येत आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर राजकिशोर मोदी यांच्यासह माजी उप नगराध्यक्ष मनोज लखेरा, माजी नगरसेवक महादेव आदमाणे, कचरूलाल सारडा, खालेद चाउस, सुनील वाघाळकर दिनेश भराडीया, सुनील व्यवहारे,अमोल लोमटे, धम्मा सरवदे, सुधाकर टेकाळे, गोविंद पोतंगले, उज्जेन बनसोडे, अकबर पठाण, तौसिफ सिद्दीकी, शाकेर काझी, सुभाष कोळी, विष्णू पांचाळ,सचिन जाधव,दत्ता सरवदे, वजीर शेख, सय्यद ताहेर,विशाल पोटभरे, कैलास कांबळे,भारत जोगदंड, बालाजी जोगदंड, सुशील जोशी, जमादार पठाण, अरबाज पठाण, खलील जाफरी, शरद काळे, जावेद शेख, शाहिद शेख, रफिक गवळी, मुनिर शाह, अस्लम शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.