लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्याला एक वेगळी ओळख निर्माण करवून दिली-राजकिशोर मोदी
लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- देशाचे माजी अवजड उद्योग मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व विलासरावजी देशमुख यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याच्या जडणघडनेला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते असे परखड मत अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. ते लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सहकार भवन येथे त्यांना आदरांजली वाहताना बोलत होते. याप्रसंगी राजकिशोर मोदी यांच्या समवेत माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा,माजी नगरसेवक महादेव आदमाणे, अमोल लोमटे, दिनेश भराडीया, सुनील व्यवहारे, बबन पानकोळी, सुभाष कोळी, खयामोद्दीन काझी,जमादार पठाण, गोविंद पोतंगले, विष्णू पांचाळ, गणेश मसणे, विजय रापतवार, शाकेर काझी, विशाल पोटभरे, सचिन जाधव, जावेद गवळी, मतीन जरगर,कैलास कांबळे, महेश कदम, आकाश कऱ्हाड, रोहन कुरे, विशाल जगताप, शाहिद शेख,महेश वेडे,शेख जावेद, आशिष ढेले, संतोष चिमणे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम स्व विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून स्व विलासराव देशमुख यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात विशाल जगताप यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.पराभवाला न ढळता फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी कशी घ्यावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व विलासराव देशमुख हे आहेत असे स्पष्ट मत विशाल जगताप यांनी मांडले. विधानसभे पाठोपाठ विधान परिषदेला देखील निसटता पराभव स्वीकारून देखील त्यांनी उमेद न सोडता पुन्हा नव्या उमेदीने सामोरे जाऊन महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून स्व विलासराव देशमुख हे राहिले होते. तेव्हा त्यांच्याकडून कुठल्याही पराभवाला कवटाळून न बसता त्याचा खिलाडू वृत्तीने स्वीकार करून पुढे गेले पाहिजे हीच शिकवण आपणास स्व विलासराव देशमुख यांच्याकडून घेण्याजोगी असल्याचे देखील विशाल जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले.
लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहताना राजकिशोर मोदी यांनी विलासराव देशमुख यांच्या जीवनपटला उजाळा दिला. त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास आपण जवळून अनुभवल्याचे मोदी यांनी सांगितले. विलासराव देशमुख यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात बाभूळगाव ग्रामपंचायत सदस्य पदापासून केल्याचे नमूद केले. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास अतिशय वाखाणण्याजोगा व इतरांनी त्यातून बरच काही शिकण्यासारखेच आहे.
अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देतांना विलासराव देशमुख यांनी नेहमीच झुकते माप दिल्याचे यावेळी राजकिशोर मोदी यांनी आवर्जून उल्लेखित केले. त्यांनी दिलेल्या निधीच्या बळावरच आपण अंबाजोगाई शहरात विकास कामे करू शकल्याची कबुली मोदी यांनी दिली. लातूर बरोबरच त्यांनी अंबाजोगाई शहरासाठी देखील विकासाची गंगा ज्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास, वैधानिक विकास महामंडळ या व अशा विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याचे राजकिशोर मोदी यांनी आवर्जून सांगितले. मराठवाड्याचा राजहंस काळाने आकस्मिक पणे हिरावून नेला. त्यांच्या आकस्मित जाण्याने केवळ मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.