स्व.सुनील लोमटे हे जनसामान्यांचा आधार होते – न्या.वसंतराव पाटील
सामान्यांचा नवाब सुनिलकाका या पुस्तकाचे प्रकाशन
अंबाजोगाई -: स्व.लोकनेते सुनील लोमटे यांनी आपल्या कार्यातून स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले.सामान्य माणसाच्या वेदना ओळखून त्यांना संवेदशीलतेने मदतीचा हात दिला. त्यांना सामाजिक न्याय व पाठबळ दिले. ही जाणीव आजही समाजमनात कायम आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायधिश वसंतराव पाटील यांनी केले. येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात लोकनेते सुनिलकाका लोमटे सामाजिक प्रतिष्ठान, अंबाजोगाई यांच्या वतीने “सामान्यांचा नवाब सुनिलकाका” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून न्या.पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दाजीसाहेब लोमटे होते. तर व्यासपीठावर माजी आमदार संजय दौंड,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक अभिजित पाटील,प्रसिद्ध कवियत्री विमल माळी, प्रा.सतीश पत्की, अँड. सयद शेख, गिरीधारीलाल भराडिया,बबन लोमटे, उपस्थित होते.
या वेळी बोलताना न्या. पाटील म्हणाले की स्व. सुनील लोमटे यांनी आपल्या कार्यातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती समोर आपल्या पुस्तकातून नवा आदर्श ठेवला आहे. एका व्यक्तीच्या निधनानंतर ही लोक त्यांच्या कार्याला विसरत नाहीत. त्यांचे कार्य या पुस्तकातून प्रेरणा देत राहील. असे सांगून स्व. सुनील लोमटे यांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी संजय दौंड,सतीश पत्की,विमल माळी,अँड.सयद, सचिन मुळुक,अभिजित पाटील यांनी आपल्या सुनील लोमटे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
या वेळी आपल्या प्रास्ताविकात शोभा लोमटे यांनी या पुस्तकाद्वारे आठवणींना उजाळा दिला असल्याचे सांगितले. सुनीलकाका यांच्या निधनानंतर जनसामान्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या.त्याच या पुस्तकात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “सामान्यांचा नवाब सुनिलकाका” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाचे संचलन प्रकाश बोरगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार ऋषिकेश लोमटे यांनी मानले. या कार्यक्रमास महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकनेते सुनिलकाका लोमटे सामाजिक प्रतिष्ठान, अंबाजोगाई च्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.