लग्न जमण्यासाठी मराठा सोयरिक संस्था आणि अशोक कुटेचे कार्य कौतुकास्पद… नगराध्यक्ष प्रदीप भैय्या पाटील
गंगापूर येथे मराठा वधु वर परिचय मेळावा संपन्नगंगापूर येथे पांडुरंग लॉन्स या ठिकाणी सकल मराठा समाज आणि मराठा सोयरिक संस्था यांच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष अशोकजी कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच राज्यस्तरीय ८८ वा मराठा वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला . हा संपूर्ण मेळावा मोफत होता.याप्रसंगी सकल मराठा समाज आणि कुटेचे लग्न जमण्यासाठीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे .असे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रदीप भैय्या पाटील यांनी केले आहे.
या ठिकाणी विधवा ,विदुर, घटस्फोटीत ,फ्रेश अशा अनेक मुला मुलींचे बायोडेटा वाचन घेण्यात आले .यामध्ये जिल्ह्यातून आणि जिल्हा बाहेरील अनेक वर आणि वधू त्याचबरोबर त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यामध्ये ५०० पेक्षा जास्त वधू-वरानी लाभ घेतला यावेळी नानासाहेब दानवे म्हणाले की,मुलींनी केवळ सरकारी नोकरी करणाऱ्या मुलांच्या मागे न लागता ,चांगला व्यवसाय आणि शेती करणाऱ्या निर्व्यसनी सुसंस्कृत मुलांसोबत लग्न करून सुखी संसार करावे.ही काळाची गरज आहे . त्याचबरोबर मुलींनी सरकारी नोकरी ,स्वतःचा फ्लॅट, त्याचबरोबर शेती अशा अनेक अपेक्षा न बाळगता आपल्या वयोगटानुसार आणि सहविचार जुळतील असा जोडीदार निवडावा .त्यामुळे दोघांचेही विचार जुळून येतील आणि उभयंताचा संसार सुखी समृद्ध होईल. नाहीतर अनेक खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या तर दोघांचे वय वाढत जातात. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. असे प्रतिपादन दानवे यांनी केले.या मेळाव्यासाठी मोफत दरात मंगल कार्यालय उपलब्ध करून देणारे पांडुरंग लॉन्स चे संचालक संजय शेळके ,कारभारी गरड, अंकुश जाधव, दत्तात्रय घोगरे,देविदास गावंडे,नगरसेवक दीपक साळवे ,विलास वाघ, डॉ.अमित गुंजाळ,मोती वाघ, पाचपुते, तुळशीदास पाठे ,कडूबा हारदे, विष्णू कोरेकर ,रामभाऊ चव्हाण,पत्रकार विशाल जोशी, विजय बनसोड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित सर्व वधू वर आणि त्यांच्या पालकांना चहापान आणि नाश्ता चे आयोजन करण्यात आले होते.
(प्रतिनिधीःविशाल जोशी गंगापूर)