स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीटी स्कॅन मशिन सुरु होण्याच्या हालचालींना वेग.
संजय दौंड यांनी घेतली वैद्यकीय शिक्षण सहसंचालकांची भेट
अंबाजोगाई (प्रतिनिधी)– स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहा महिन्यांपासून बंद असलेली सिटी स्कॅन मशिन सुरु करण्यासाठी विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालयात जावू वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक सुरवसे यांची भेट घेऊन या संदर्भात विशेष चर्चा केली. सदरील प्रश्न निकाली काढण्यासाठी आता सहसंचालकांनी पुढाकार घेतला आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात असलेली सीटी स्कॅन मशिन गेली सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्या कडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत असून ही या प्रश्नातील गुंतागुंत अधिकच वाढत चालली होती.
मागच्या आठवड्यात या बंद असलेल्या सीटि स्कॅन मशिन चार एक पार्ट यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बंद पडलेल्या सीटी स्कॅन मधून काढून आणून बसण्याची परवानगी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालनालयाने दिली होती. त्यानुसार हा पार्ट यवतमाळ येथून काढून अंबाजोगाई येथे आणण्याची प्रक्रिया सुरु ही झाली. मात्र सदरील पार्ट बसवण्यापुर्वी अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाने आपल्या करारातील थकलेले ४४ लाख रुपयांचे बील अदा करावे, त्यानंतरच आपण तो पार्ट बसवू अशी आडमुठी भुमिका फिलीप्स कंपनीने घेतली असल्यामुळे ही मशिन आता सुरु होत नाहीये. या सर्व प्रश्नांची वस्तुस्थिती विधान परिषदेचे माजी सदस्य संजयभाऊ दौंड यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सह संचालक सुरवसे व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे सचीव मनोहर हीरे यांच्या निदर्शनास आणून दिली व यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी या संदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालकांनी केलेल्या पत्रव्यवहाराची कागदे ही दाखवली. या सर्व चर्चेअंती वैद्यकीय शिक्षण सहसंचालक व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे सचीव मनोहर हीरे यांनी सकारात्मक भुमिका घेत फिलीप्स कंपनीचे थकीत ४४ लाखांचे बील काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या आहेत. यामुळे गेली सहा महिन्यांपासून बंद असलेली सीटी स्कॅन मशिन सुरु होण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे.