मनपा माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
शिक्षणाबरोबर सुसंस्कारित पिढी घडवण्याचे काम आई करत असते – प्रा. मकरंद खेर
नगर : विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे जाऊन द्या, पालकांनी त्यांच्यावर दबाव न टाकता त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहावे, विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आवड, निवड आणि अथक परिश्रम याकडे विशेष लक्ष द्यावे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे, सध्याच्या मोबाईल क्रांतीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांवर शिक्षणाबरोबर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे, आणि ते काम आई करू शकते या माध्यमातून माणुसकीयुक्त पिढी निर्माण होईल, माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांचे गेल्या 22 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप देण्याचे काम सुरू असून हे कौतुकास्पद व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन प्रा. मकरंद खेर यांनी केले.
बालिकाश्रम रोड,धर्माधिकारी मळा येथे मनपा माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला, यावेळी प्रा. मकरंद खेर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी सभापती गणेश कवडे, माजी नगरसेवक दगडू मामा पवार, माजी सभापती पुष्पा बोरुडे, भीमाशंकर लांडे, विश्वनाथ जाधव, पारुनाथ ढोकळे, दशरथ पाटील, प्रदीप नातू, हेमंत धर्माधिकारी, अश्विनी बोरुडे, डॉ. वैष्णवी बोरुडे, रूपाली म्हसे, ओंकार बोरुडे, शरद बोरुडे संतोष उगले, अतुल राउत, सागर मुळे, विदुनाथ जोशी आदी उपस्थित होते
माजी उपमहापौर अनिल बोरुडे म्हणाले की, प्रभागाच्या विकास कामांबरोबर सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असतात या माध्यमातून नागरिकांची ऋणानुबंध निर्माण होत असतो विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप मिळावी यासाठी गेल्या २२ वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला जातो, १० वी १२ वीतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो या माध्यमातून ऊर्जा व प्रेरणा मिळत असते आणि पुढील वाटचाल यशस्वी होत असते असे ते म्हणाले.
माजी सभापती गणेश कवडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादित करावे, सध्याचे युग हे स्पर्धेचे असून त्यात टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे, राजकारण देखील चांगले क्षेत्र असून यात सामाजिक काम करून आपला चांगला ठसा उमटवू शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजकारणात येण्याचाही विचार करावा, समाजात वावरत असताना आपले महत्व टिकून ठेवण्यासाठी कार्य करावे असे ते म्हणाले.
भीमाशंकर लांडे म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि तो तसाच राहिला मोबाईल पासून विद्यार्थ्यांची पिढी लांब ठेवावी, जेणेकरून चांगला विद्यार्थी घडला जाईल, विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकरीच्या पाठीमागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रातील व्यवसायाकडे वळावे, त्याचे शिक्षण घेऊन चांगला उद्योग निर्माण करावा असे ते म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक दगडू मामा पवार, विश्वनाथ जाधव, पारुनाथ ढोकळे, डॉ. वैष्णवी बोरुडे आदींची भाषणे यावेळी झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सभापती पुष्पा बोरुडे यांनी मानले.