प्राचार्य राजाभाऊ धाट सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाचे ३० जुन रोजी आयोजन
मान्यवरांची उपस्थिती ; समारोह समितीची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती आहे. विद्यार्थीप्रिय आणि प्रयोगशील प्राचार्य म्हणून ज्यांचा आजही नांवलौकिक आहे. व ज्यांनी शिक्षणासोबतच वित्त, ग्रामीण आणि कृषी विकास, अ.भा.वि.प., सहकार भारती अशा विविध क्षेत्रातील संस्था आणि सेवाकार्याच्या उभारणीत आणि विकास कार्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्या प्राचार्य राजाभाऊ धाट यांच्या बहुमोल कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अंबाजोगाई शहरात प्राचार्य धाट यांचे चाहते, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील सहकारी यांनी एकत्रित येत समारोह समितीच्या माध्यमातून सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाचे रविवार, दिनांक ३० जून २०२४ रोजी आयोजन केले आहे. यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती समारोह समिती व धाट परिवार यांच्या वतीने देण्यात आली आहे.
केल्यानें होत आहे रे । आधीं केलेंची पाहिजे ।। किंवा साधना के देश में मत नाम ले विश्राम का । कर्तव्य पथ पर तू बढा चल कार्य यह भगवान का ।। या मंत्राचा जागर करीत प्राचार्य धाट सर हे त्यांच्या आयुष्यात सतत कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या बहुमोल कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अंबाजोगाई शहरात ज्येष्ठ वद्य नवमी शके १९४६, रविवार, दिनांक ३० जून २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारोह अनिकेत मंगल कार्यालय एल.आय.सी. ऑफीस समोर, परळी रोड, अंबाजोगाई, जि.बीड (महाराष्ट्र) येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारोहाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अशोक मोडक (भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा.वि.प. तथा गुरू घासीदास केंद्रीय विश्वविद्यालय, बिलासपूर कुलाधिपती) हे आहेत. यावेळी दाजी पणशीकर (ज्येष्ठ विचारवंत, ठाणे) यांचे आशीर्वचन लाभणार आहे. तर सूर्यकांत केळकर (भूतपूर्व राष्ट्रीय संघटन मंत्री, सहकार भारती) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोहात सतीश मराठे (सदस्य, केंद्रीय संचालक मंडळ, भारतीय रिझर्व बँक) हे प्रमुख वक्ते आहेत. या कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ९ ते १० या वेळेत तुला करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० ते ११ या कालावधीत मी अनुभवलेले धाट सर या विषयावर मनोगते व्यक्त करण्यात येतील. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत प्रकट कार्यक्रम होईल. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव ग्रंथ विमोचन करण्यात येईल. तरी या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. समारोहास येताना पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नये. आपली उपस्थिती हीच अनमोल भेट आहे. अशी विनंती प्राचार्य राजाभाऊ धाट सहस्त्रचंद्र दर्शन समारोह समिती व धाट परिवार यांनी केली आहे. तर समारोहाबाबत अधिक माहितीसाठी समारोह समितीचे डॉ.अ.द.पत्की (मो.९४२०५७७१४७) , डॉ.प्रफुल्ल पानसे (मो.९४२२२१२२६०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.