जातीअंत संघर्ष समिती आक्रमक ; आसाम व तामिळनाडू मधील अल्पसंख्यांकांच्या हत्येचा केला निषेध
तीव्र निदर्शने करून दिले उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
आसाम मध्ये तथाकथित गोरक्षक झुंडींनी अल्पसंख्यांक समुदायातील ३ मुस्लिमांच्या हत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेचा जातीअंत संघर्ष समितीचे कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दिनांक ९ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जातीअंत संघर्ष समिती, जिल्हा बीड यांच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आसाम मध्ये तथाकथित गोरक्षक झुंडींनी अल्पसंख्यांक समुदायातील ३ मुस्लिमांच्या हत्या केल्या याबाबत तेथील राज्य सरकारने कोणतीही तातडीची कार्यवाही केली नाही. तसेच तामिळनाडू येथे पी.आर्मस्ट्राॅंग यांची त्यांच्या घरासमोर ५ जुलै २०२४ रोजी हत्या करण्यात आली आहे. यात त्या त्या परिसर व राज्यातील धर्मांध सांप्रदायिक संघटना आहेत. त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. असे निवेदनात नमूद केले आहे. सदरील निवेदनावर कॉ.बब्रुवाहन पोटभरे, राजाराम कुसळे, शेख बाबा, दत्ता काटे, शाहेद शेख, सुनिल वारकरी, सज्जू लाला, बापू गोमसाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर निदर्शनात संतोष चव्हाण, सचिन गालफाडे, संतोष पवार, कान्होपात्रा माने, निकीता माने, सुनिता गोमसाळे, शेख फेरोज आदींसह अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, युवती व युवक सहभागी झाले.
सांप्रदायिकतेचा व धर्मांध हत्यांचा जाहीर निषेध :
लोकसभा निवडणुकीनंतर देशात जातीयवादी भाजपच्या पाळीव संघटनांनी दलित व अल्पसंख्यांक यांना लक्ष्य करून मागील काही दिवसांपासून पुन्हा प्राणघातक हल्ले सुरू केले आहेत. नुकतेच ७ जुलै रोजी आसाम मध्ये तथाकथित गोरक्षक झुंडींनी अल्पसंख्यांक समुदायातील ३ मुस्लिमांच्या हत्या केल्या व तामिळनाडू येथील बीएसडीचे राज्याध्यक्ष पी.आर्मस्ट्राॅंग यांची त्यांच्या घरासमोर ५ जुलै २०२४ रोजी हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही दु:खद घटनांचा, सांप्रदायिकतेचा व धर्मांध हत्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. याच निषेध करण्यासाठी आज निदर्शने करण्यात आली. हे वेळीच थांबले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल.