इनरव्हील क्लब तर्फे डॉक्टर्स डे साजरा ; डॉक्टर्सच्या कर्तृत्व गौरव सोहळ्याचे आयोजन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई इनरव्हील क्लब तर्फे डॉक्टर्स डे चे औचित्य साधत अंबाजोगाईतील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक बांधिलकी जपत वैद्यकीय सेवा देत असलेल्या डॉक्टर्सचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या गौरव सोहळ्यात इंडीयन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक समितीचे प्रमुख तथा सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.अरूणा केंद्रे, स्त्री रोग व प्रसूती विभागाचे विभागप्रमुख डॉ.गणेश तोंडगे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.स्नेहल पेस्टे, बधिरीकरण विभागाच्या डॉ.राजश्री धाकडे, माधवबागच्या अंबाजोगाई शाखेच्या डॉ.गौरी कुलकर्णी, दंतरोग तज्ज्ञ डॉ.अश्विनी सोनी, डॉ.अश्विनी भुसारे यांचा इनरव्हील क्लबच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी आजचा सत्कार हा सत्कार्याचा सत्कार होत आहे. हे सत्कार सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा देत असतात. प्रत्येक सत्कारागणिक सत्कारमूर्तीवर जबाबदारी वाढत असते ते पेलण्याचे सामर्थ्य अशा गौरव सोहळ्यातून येत असते. इनरव्हील क्लबने ही सामाजिक बांधिलकी पाळत हा प्रातिनिधिक सत्कार केल्याबद्दल डॉ.इंगोले यांनी क्लबचे आभार मानले. तर डॉ.अरूणा केंद्रे यांनी आपल्या भाषणात बोलताना समाजात समाजासाठी कार्य करणारे अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व असतात. त्यांना प्रेरणा, चालना व ऊर्जा देण्यासाठी त्यांच्या कार्याचा कुठे तरी गौरव व्हावा म्हणून अशा प्रकारच्या सकारात्मक प्रोत्साहनाची गरज असते आणि इनरव्हील क्लबच्या माध्यमातून झालेला हा सत्कार आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरक ठरेल असे मत व्यक्त केले. डॉ.राजश्री धाकडे यांनी एक अप्रतिम कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनरव्हील क्लबच्या नूतन अध्यक्षा निवृत्त मुख्याध्यापिका सुरेखा सिरसट यांनी केले. आभार प्रदर्शन कल्पना शिंदे तर बहारदार सूत्रसंचालन माजी अध्यक्षा सुनिता कात्रेला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संगिता नावंदर, भावना कांबळे, जयश्री कराड, सुरेखा कचरे, जयश्री लव्हारे, वर्षा देशमुख, तन्वी कळमकर, माजी मुख्याध्यापिका चंद्रकला देशमुख, जयश्री कराड यांनी प्रयत्न केले.