शिक्षकांच्या सेवेचा गौरव करणे ही भा.शि.प्र. संस्थेची परंपरा.
“अनेक वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या सेवेचा गौरव करणे ही भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची परंपरा आहे,” असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलूरकर यांनी केले. ते प्रा.संजय धांडे यांच्या सेवा गौरव सोहळ्यामध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर सेवा गौरव मूर्ती प्रा. संजय धांडे, सौ. वैशाली धांडे ,भा.शि.प्र. संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष श्री.राम कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.सौ. कल्पनाताई चौसाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी ,दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. मकरंद पत्की आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
खोलेश्वर महाविद्यालयातील व्यवसाय शिक्षण विभागातील बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस अँड फायनान्स या विभागातील पूर्ण वेळ शिक्षक प्रा. संजय पुरण धांडे हे नियत वयोमानानुसार दिनांक 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने खोलेश्वर महाविद्यालयात त्यांचा सेवा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने श्री. व सौ. धांडे यांचा सन्मानचिन्ह, साडी -चोळीचा संपूर्ण आहेर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना डॉ.आलूरकर म्हणाले की आपण जेथे काम करतो त्या घटकाला आपला परिवार मानने ही खूप मोठी बाब आहे. यापेक्षा दुसरी कोणती मोठी कृतार्थता नाही. ही भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होण्यासाठी तुम्ही सहकारीच त्याला कारणीभूत असता.हा कृतार्थ भाव प्रा. धांडे सरांनी जपला आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त प्रा. नितीन केंद्रे यांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
आपल्या भावना व्यक्त करताना सेवा गौरव मूर्ती प्रा. संजय धांडे म्हणाले की केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा एक वेगळा ठसा उमटविणाऱ्या व अग्रेसर असणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत मला नोकरी करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज संस्था वर्धापन दिनी माझा सेवा गौरव होत आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. या संस्थेत प्रारंभी स्वा.सावरकर महाविद्यालय, बीड येथे व नंतर खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई येथे काम करत असतानाच अनेक गोष्टी मला शिकता आल्या व त्यातूनच मी घडत गेलो. म्हणून स्वा.सावरकर परिवार व खोलेश्वर परिवार हे दोन्ही परिवार माझ्यासाठी सदैव प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. ज्या गुरुजनांनी मला येथे काम करण्याची प्रेरणा दिली त्यांचे मी आभार मानतो अशा भावना व्यक्त करून आपल्या सेवा काळातील अनेक गोष्टींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. मला या महाविद्यालयात सेवा करण्याची संधी संस्थेने दिली त्याबद्दल मी संस्थेचा ऋणी आहे असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले.
मा. राम कुलकर्णी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की या संस्थेत नोकरी करण्याची संधी एखाद्या शिक्षक कार्यकर्त्याला मिळणे ही त्याच्यासाठी आनंदाची व भाग्याची गोष्ट असते. प्रा.धांडे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनी केले. ते म्हणाले की एखाद्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा उचित गौरव करण्यासाठीच अशा प्रकारच्या सेवा गौरव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे सांगून त्यांनी प्रा. संजय धांडे यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच भा.शि.प्र. संस्थेच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी आज महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली, ज्यात महाविद्यालय परिसरात हॉर्टिकल्चर विभाग व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम, पाचव्या डिजिटल वर्ग खोलीचे उद्घाटन, नूतन इमारत वीट बांधकामाचा शुभारंभ व छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. विवेक देशपांडे (रुद्रानी कन्स्ट्रक्शन) यांनी महाविद्यालयास दिलेल्या जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन आदी बाबींचा समावेश होता. यावेळी डॉ.सौ. कल्पनाताई चौसाळकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की आजच्या दिवसाची सुरुवात व शेवट हा भारावलेल्या वातावरणात होत आहे. आज असलेल्या संस्था वर्धापन दिनानिमित्त तसेच प्रा. संजय धांडे यांच्या सेवापूर्ती बद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. या यावेळी प्रा.विनय राजगुरू,प्रा. डॉ. दिगंबर मुडेगावकर,प्रा. डॉ. बिभिषण फड, कु. साक्षी धांडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी सीबीएसई इंग्लिश स्कूलचे प्रमुख प्रा. डॉ. गोपाळ चौसाळकर, डॉ. प्रवीण जोशी, प्रा. एस. पी. कुलकर्णी, ॲड. मकरंद पत्की, व्यवसाय शिक्षण विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. रवींद्र कुंबेफळकर, प्रा. धांडे यांचे सर्व कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जीजाराम कावळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ.अजय डूबे यांनी मानले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ. सुरेंद्र आलूरकर प्रतिनिधी (अंबाजोगाई) दि. 29 जून 2024