११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन विविध उपक्रमांचे आयोजन
स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
मसाप च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व उपक्रमात विद्यार्थी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी केले आहे. नियोजित ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी स्वागत समिती आणि मसाप कार्यकारिणी सदस्यांची एक व्यापक बैठक येथील पत्रकार कक्षात नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी साहित्याशी निगडित असलेल्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. हे उपक्रम प्रत्येक महिन्यात एक या पध्दतीने घेण्यात येणार आहेत. या बैठकीस स्वागत समिती आणि मसाप चे सदस्य
चंद्रकला देशमुख, तिलोत्तमा पतकराव, वंदना तेलंग, विजय रापतवार, डॉ. राहुल धाकडे, सुभाष बाहेती, गोरख शेंद्रे, दत्ता अंबेकर, अमर हबीब, दगडू लोमटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे मसाप आणि स्वागत समितीच्या वतीने कथा कार्यशाळा, शिक्षक कवी संमेलन, व्यक्तिचित्रण लेखन स्पर्धा, हस्ते लेखन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा अशा पाच उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कथा कार्यशाळेची जबाबदारी प्रख्यात छाती रोग तज्ञ डॉ. राहुल धाकडे यांचे वर, शिक्षक कवी संमेलनाची जबाबदारी शिक्षक मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय रापतवार यांचे वर, व्यक्तीचित्रणं लेखन स्पर्धेची जबाबदारी रेखा देशमुख यांचे वर, हस्तलेखन स्पर्धेची जबाबदारी तिलोत्तमा पतकराव यांचे वर तर सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखाची जबाबदारी सुनील व्यवहारे यांच्या वर सोपवण्यात आली आहे.
या सर्व स्पर्धा या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे व्यवस्थित नियोजन करण्यात येवून या स्पर्धा केंव्हा आणि कोठे घेणार याची माहिती लवकरच त्या त्या स्पर्धांचे प्रमुख कळवतील त्यानुसार या सर्व घेण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकांनी आपली तयारी सुरु करावी असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी केले आहे.