खेळामधून विज्ञान प्रयोग कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आली खूपखूप मज्जा…
अंबाजोगाई – योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या पपू बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय विज्ञानप्रयोग कार्यशाळा पार पडली. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचा खेळकर वातावरण सहजपणे अनुभव घेतला.
या कार्यकमासाठी जळगाव येथील विज्ञानसंवादक प्रा. दिलीप भारंबे आणि प्रा. आर ए पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनात श्री योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात इयत्ता 9 वी व 10 वी सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचा अनुभव घेतला. भौतिकशास्त्रामध्ये जड वाटणाऱ्या अवघड जाणाऱ्या विविध संकल्पना साध्या प्रयोगातून खेळत खेळत सहजपणे समजावून घेतल्या. या कार्यक्रमात प्रा दिलीप भारंबे यांनी प्रकाशाविषयीचे नियम, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ऑप्टिकल फायबर, सेंट्रलफोर्स , सेंट्रीफ्युगल फोर्स ,लेन्स लॉ, एलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, पॅरिस लॉ, इलेक्ट्रिक मोटर, विद्युत जनरेटर, आर्किमिडीज प्रिन्सिपल, मल्टिपल इमेजेस , इनफिनीट इमेजस, पृष्ठीय तणाव, सरफेस टेन्शन असे अनेकविध प्रयोग केले. अत्यंत साध्या वस्तू वापरून, कुठलंही मोजमापाचे साहित्य न वापरता त्यांनी हे प्रयोग केले. तसेच या प्रयोगांमधून समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा द्यावा, अंधश्रद्धा कशा दूर कराव्या समाजात हेही सांगितले. विज्ञानाचे नियम/तत्वज्ञान वापरून फसवणूक केल्या जाणाऱ्या गोष्टी याबाबत अवगत केले. तसेच जीवशास्त्रीय प्रयोग करताना प्रा आर ए पाटील सरांनी सुक्ष्मदर्शकाची रचना समजावून सांगत कांदयाच्या पेशीच्या स्लाइड कशा बनवाव्या याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी कांदयाच्या पापुद्रयातील वनस्पती पेशी सुक्ष्मदर्शकातून पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना असे मत व्यक्त केले की अशा प्रकारची प्रयोग आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते हे प्रयोग शिकताना पाहताना आम्हाला खूप आनंद वाटला खूप मज्जा आली आणि विज्ञान किती सोपे आहे हेही कळले. या कार्यशाळेसाठी योगेश्वरी संस्थेचे सहसचिव श्री भीमाशंकर शेटे, सहसचिव श्री लंकेश वैद्य कार्यकारिणी सदस्य श्री अभिजीत लोहीया तसेच शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.