नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा तारा बाई नावाच्या एका महिलेने अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचवला.
महिलेने जर धाडस केला तर काय होतं याचा प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आला असून गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा तारा बाई नावाच्या एका महिलेने अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचवला आहे. स्वतःचे जीव धोक्यात घालून दोन तरुणांना वाचवणाऱ्या ताराबाईंचा सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरणाचे पाणी पातळी वाढल्यामुळे गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढविण्यात आला आणि गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील रहिवासी असलेले तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे, अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे भावंडे नदीतील सायपन व मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात ऊतरले असता दुर्दैवाने पाणी वाढल्याने तीनही तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. सुदैवाने जवळच शेळ्या चारण्यासाठी मंजूर येथील रहिवासी असलेल्या तारा बाई छबुराव पवार व छबुराव बाबुराव पवार यांनी सदर घटना पाहिली. शेवटी स्त्री ती स्त्रीच.
ताराबाई यांच्या मातृत्वाला जाग आली आणि त्यांनी कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीच्या आधारे त्याना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तर छबुराव पवार यांनी देखील मदत केली. तारा बाईंच्या प्रयत्नांना यश देखील आले. त्यातील दोघांना त्यांनी बाहेर काढले त्यात संतोष भीमाशंकर तांगतोडे (वय 25) हा तरुण प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृतदेह शुक्रवारी काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.तारा बाई यांच्या धाडसाचं कौतुक हे सर्व स्थरावर होत आहे. दरम्यान ताराबाई यांना शासनाकडून सन्मानित करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी आपली यंत्रणा कामाला लावली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि जिगरबाज तरुणांनी अथक मेहनत घेतली.