मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्राची फिरते विज्ञान प्रदर्शन अंबाजोगाईत.
31 जुलै ते 15 ऑगस्ट या काळात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग.
अंबाजोगाई प्रतिनिधी :-
योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई संचालित पपू बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्र यांच्या पुढाकाराने मुंबई येथील नेहरू सायन्स सेंटर यांची Mobile Science Van (फिरती विज्ञान प्रयोगशाळा) या उपक्रमाच्या अंतर्गत अनेक शाळांमधून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 31 जुलै ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमांत अंबाजोगाई परिसरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना हे फिरते विज्ञान प्रदर्शन प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन विज्ञानाचे नाविन्यपुर्ण उपक्रम अनुभवता येत नाहीत. यासाठी अंबाजोगाई व परिसरात अशा प्रकारचे विज्ञानप्रसाराचे उपक्रम राबवण्यासाठी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून योगेश्वरी शिक्षण संस्था नेहमीच पुढाकार घेत असते. मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्राकडे विविध विषयावर महाराष्ट्रभर विज्ञान प्रसार करणाऱ्या 45 गाड्या असुन त्यापैकी एक गाडी अंबाजोगाईच्या विद्यार्थ्यांसाठी आणण्याच्या प्रक्रियेत योगेश्वरी संस्थेच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. बीड जिल्ह्यात ही गाडी पहिल्यांदाच येत आहे. यासाठी मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक श्री उमेशकुमार रस्तोगी आणि शिक्षण अधिकारी श्री डी एस धार्मिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या गाडीत 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वास्थविज्ञान व स्वच्छता (Hygiene and Sanitation) याविषयीचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थी प्रत्यक्ष गाडीत जाऊन आणि गाडीभोवती फिरून हे प्रयोग पाहू शकतील. तसेच यावेळी मनोरंजनातून आणि खेळातून विज्ञान समजून सांगणारे प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवले जातील. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून त्यासोबतच सोमेश्वर कन्या व मुलांचे विद्यालय घाटनांदूर , संभाजीराव बडगीरे विद्यालय ममदापूर, महाराष्ट्र विद्यालय मोहा, आसूबाई विद्यालय मांडेखेल, खोलेश्वर विद्यालय अंबाजोगाई, विवेकानंद बालक विद्यामंदिर अंबाजोगाई अशा विविध शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. भविष्यात नेहरू विज्ञान केंद्राच्या विज्ञान प्रसार करणाऱ्या गाड्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस आहे. या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी इच्छुक शिक्षकांनी व शाळांनी पपू. बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राशी जोडून घ्यावे असे आवाहन विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
हेमंत धानोरकर 9960096062
गणेश कदम – 8668697827