११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलना निमित्त २४ ऑगस्ट रोजी कथा लेखन कार्यशाळेचे आयोजन
दत्ता पाटील यांच्या हस्ते उद्घाटन तर प्रा. कमलाकर कांबळे, प्रा. आसाराम लोमटे यांचे मार्गदर्शन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने आयोजित ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलना निमित्त २४ ऑगस्ट २०२४ रोजी कथाकथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेचे उद्घाटन दत्तात्रय (आबा )पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यशाळेस ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार आसाराम लोमटे (परभणी,)व ज्येष्ठ लेखक तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार व संयोजक डॉ. राहुल धाकडे यांनी दिली आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार आणि संयोजक डॉ. राहुल धाकडे यांनी पुढे असे म्हटले आहे की, मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलन निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मधील “कथा लेखन कार्यशाळा” हा पहिला उपक्रम २४ ऑगस्ट २०२४ रोजी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात येणार आहे.
ही कथा लेखन कार्यशाळा तीन सत्रात आयोजित करण्यात आली असून पहिले सत्र उद्घाटनाचे असेल. हे सत्र सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या सत्रात उद्घाटक म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थानिक नियोजन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय (आबा )पाटील हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास सिरसाठ हे राहणार आहेत. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार व मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे यांची उपस्थिती राहील.
दुसरे सत्र उद्घाटनीय कार्यक्रमानंतर लगेचच सुरु करण्यात येणार असून या सत्रात “कथा लेखनाचे तंत्र” या विषयावर ज्येष्ठ लेखक तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
दुसऱ्या सत्रानंतर महाविद्यालयाच्या परिसरातच अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून अल्पोपहारा नंतर तिसरे सत्र सुरू होईल. या सत्रात “माझ्या कथांची जन्मकथा व प्रश्नोत्तरे” या विषयावर ज्येष्ठ लेखक तथा पत्रकार प्रा. आसाराम लोमटे हे मार्गदर्शन करणार आहेत.
▪️संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार
यांचा सत्कार
या सत्रानंतर चौथ्या सत्रात समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील प्रतिभावंत लेखक बालाजी सुतार यांचा सत्कार स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांच्या हस्ते संपन्न होईल. या कार्यशाळेचे संयोजक तथा मसाप चे उपाध्यक्ष डॉ. राहुल धाकडे, मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित असतील.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध उपक्रमातील पहिला उपक्रम असलेल्या या “कथालेखन कार्यशाळा” याचा लाभ शहरातील नवोदित साहित्यिक, विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, संयोजक डॉ. राहुल धाकडे आणि मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी केले आहे.