विद्यार्थ्यांनी नियमित राहून अभ्यास, कलागुणांचा विकास साधा : डॉ जवाहर मोरे
उच्च माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक वाटा आहेत. महाविद्यालय आणि महाविद्यालयातील प्राध्यापक हे नेहमीच सकारात्मक आणि नवे काही करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहतील. नियमित येऊन व नियमांत राहून अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांचा विकास साधावा, असे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. जवाहर मोरे यांनी केले. ते मंद्रूपच्या संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात बुधवारी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक देडे, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. सी. एस. मुलगे, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. श्रीमती बी. एस. कोरे, विज्ञान शाखेचे प्रा. डॉ. संगमेश्वर निंबर्गी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी संस्थापक स्व. दी. शि. कमळे गुरुजी, स्व. संतोष पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना प्र. प्राचार्य डॉ. जवाहर मोरे म्हणाले, या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, जिमखाना विभाग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, यासह विविध मंडळांच्या माध्यमातून अभ्यासाबरोबरच प्रगती साधता येते. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सहाय्य करते. विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन प्रगती साधावी. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात बीए. बीकॉम, बीएस्सी भाग एक या वर्गातील विद्यार्थ्यांचे द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे प्राचार्यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाविषयी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. डी. के. देडे यांनी केले. प्रा. श्रीमती बी. एस. कोरे यांनी नावांची उद्घाेषणा केली. प्रा. डॉ. लतिका कट्टीमनी यांनी सूत्रसंचालन केले.तर प्रा. डॉ. ज्योती नादरगी यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी शिवराज मुगळे सोलापूर