दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा – मागणीसाठी सभासदांचे सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण
स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेत विशेष लेखा परीक्षकांना आढळली आर्थिक अनियमितता ; पत्रकार परिषदेत माजी संचालकांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई / परळी या संस्थेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी संस्थेची माजी चेअरमन, संचालक व सभासदांनी सोमवार, दिनांक 5 ऑगस्ट 2024 पासून सहाय्यक निबंधक कार्यालय, अंबाजोगाई येथे आमरण उपोषण सुरू केले असल्याची माहिती माजी संचालक व सभासदांनी मंगळवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
याप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी चेअरमन भगवान महिपती दराडे यांनी सांगितले की, माझ्यासह इतर सात जण ज्यात माजी संचालक आणि सभासद यांचा समावेश आहे. आम्ही रविवार रोजी पासून स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादा अंबाजोगाई / परळी आमरण उपोषणाला बसलो आहोत. पुढे हे आंदोलन साखळी पद्धतीने सुरू राहणार आहे. आमच्या आंदोलनस्थळी ज्येष्ठ नेते ऍड.अनंतराव जगतकर यांनी भेट दिली आहे. आमचा प्रश्न समजून घेत याप्रकरणी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी याबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी त्यांचे बोलणे झाले आहे. अधिक माहिती देताना माजी चेअरमन दराडे यांनी सांगितले की, स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादा अंबाजोगाई / परळीचे सन 2012 ते 2017 या कालावधीचे फेरलेखापरीक्षण सतीश काकासाहेब पोकळे (विशेष लेखा परीक्षक वर्ग-2 फिरते पथक, बीड) यांनी 15 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण करून अहवाल त्याचा दाखल केला होता. त्या अहवालानुसार या पतसंस्थेत 4 कोटी 83 लाख 60 हजार 741 रूपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न होऊन या अपहाराची जबाबदारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दादासाहेब पवार, उपाध्यक्ष गिरीधर देशमुख, सूर्यकांत धायगुडे, शिवहार भताने, मानद सचिव अंगद घुले व शर्मा गायकवाड व संचालक सुनील धपाटे, व्यंकटेश गायकवाड, गंगाधर केलूरकर, सुनील म्हेत्रे, श्रीमती प्रभावती अवचर, आशालता बोळे नानजकर, हरिश्चंद्र चाटे, पांडुरंग पांडे तसेच संस्थेचे तत्कालीन कर्मचारी, डीसीसी बँक शाखा अंबाजोगाईचे शाखा अधिकारी बालासाहेब पौळ, रोखपाल संजय साळवे यांच्यासह इतर यांच्यावर निश्चित करून आपहारास दोषी धरण्यात आले. सतीश पोकळे (विशेष लेखापरीक्षक) यांनी संस्थेतील या अनियमितता प्रकरणी संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी व संचालक, कर्मचारी यांच्यावर दिनांक 04/11/2023 रोजी पोलीस स्टेशन,अंबाजोगाई येथे फिर्याद देऊन गुन्हा नोंद करणे बाबत कळविले. परंतु, वेळीच गुन्हा नोंद न झाल्याने दोषी संचालकांनी सहकार मंत्रालय, नागपूर येथे स्थगिती आदेशासाठी प्रकरण दाखल करून दिनांक 20/12/2023 रोजी स्थगिती आदेश मिळवला. तो स्थगिती आदेश माननीय अपर मुख्य सचिव, मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 18 जुलै 2024 रोजी उठवण्यात येऊनही झाला नाही. तसेच या संस्थेचे सन 2000 ते 2012 या कालावधीचे चाचणी लेखापरीक्षण सतीश पोकळे (विशेष लेखा परीक्षक वर्ग-2 फिरते पथक, बीड) यांनी केले असून या चाचणी लेखापरीक्षणात रूपये दोन कोटी 18 लाख 29 हजार 469 रूपयांचा अपहार झाला असल्याचे निष्पन्न होऊन संस्थेच्या पदाधिकारी व संचालकांना दिनांक 20/05/2024 ला नोटिसा देऊन त्यांचे म्हणणे सादर करणेबाबत कळवले. तरी परंतु, त्या पुढील कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही. सन 2000 ते 2017 कालावधीत एकूण 7 कोटी 1 लाख 19 हजार 210 रूपयांचा अपहार झालेला असून तो संपूर्णतः संगणमताने संबंधितांचा आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी केलेला आहे. या अपहारास लेखापरीक्षणानुसार जबाबदार असणाऱ्या संस्थेच्या तत्कालीन पदाधिकारी व संचालकांसह कर्मचारी व डीसीसी बँक शाखा अंबाजोगाईचे तत्कालीन शाखा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करा याबाबत दिनांक 5 ऑगस्ट 2024 पासून सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर उपोषण आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यास प्रशासनाने न्याय द्यावा व संस्थेचे आर्थिक नुकसान भरून काढून सभासदांचे भाग परत करावेत. या मागणीसाठी माजी चेअरमन भगवान दराडे, भगवान गडदे, संजीव उमाप, विनायक चव्हाण, सर्जेराव काशिद, वैजनाथ आंबाड, श्रीमती शैला गणपतराव जाधव व श्रीमती रेखा चंद्रकांतराव टाक या आठ माजी चेअरमन, संचालक व सभासदांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या.अंबाजोगाई / परळीच्या सभासद बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.