स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर अंबाजोगाई शाळेत फिरत्या विज्ञान प्रदर्शनास उदंड प्रतिसाद.
अंबाजोगाई प्रतिनिधी :- नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई व श्री. योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित प. पू. बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य स्वच्छता विज्ञान प्रचार व प्रसारासाठी फिरत्या विज्ञान प्रदर्शन रथाचे स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर, अंबाजोगाई शाळेत उत्साहाने स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित उद्घाटन कार्यक्रमास नवक्षितिज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष दादा कुलकर्णी , स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वरुपाताई कुलकर्णी, नेहरु विज्ञान केंद्र येथील समन्वयक श्री. देवानंद भुसने सर, प. पू. बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या वतीने श्रीमती क्षीरसागर मॅडम, फिरत्या विज्ञान प्रदर्शन रथाचे चालक श्री. अमित पालांडे, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, जलपेय, अन्न, महिलांचे आरोग्य, आजारांचे व्यवस्थापन इ. विविध वैज्ञानिक प्रयोगांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन पाण्याच्या बाटलीचे राॅकेट उडवून करण्यात आले. यावेळी श्रीमती क्षीरसागर मॅडम यांनी विद्यार्थ्यांसमोर दैनंदिन जीवनातील टाकाऊ पदार्थ वापरुन विज्ञानाचे विविध प्रयोग करुन दाखवले. संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष दादा कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणात मुलांना दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्व पटवून दिले व आपल्या स्वयंपाकघरातही कशा प्रकारे विज्ञानाच्या प्रयोगांचा क्षणोक्षणी वापर होतो ते अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी फिरत्या विज्ञान प्रदर्शनास उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री. उल्हास रामदासी यांनी केले.