आयुष्य बदलायला कॅमेरा कारणीभूत मेरी बात मध्ये दत्ता वालेकर
अंबाजोगाई प्रतिनिधी :- आंतरभारती शाखा अंबाजोगाई आयोजित मेरी बात ह्या उपक्रमाचा 6 वा भाग दिनांक 10/08/2024 वार शनिवार रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात कथा लेखक व उत्कृष्ट फोटोग्राफर असणारे, आंतरभारतीचे शहर अध्यक्ष दत्ता वालेकर यांनी आपला संघर्षमय जीवनाचा सारांश आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आपला जीवन संघर्ष वर्णन करताना त्यांनी सांगितले की, आर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक शिक्षण वेळेत पूर्ण करता आले नाही. आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. वेळ प्रसंगी शेळ्या राखून, गुरे सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. पहिल्या पासून वाचनाची आवड निर्माण झाली होती. सानेगुरुजीचे पुस्तक वाचनात आले व जीवनाला नवी दिशा मिळाली. पुढे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन फोटोग्राफीच्या व्यवसायातून स्वतःची ओळख निर्माण केली. हातात कॅमेरा आला आणि जीवन बदलून गेले. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर लिखाणाची आवड निर्माण झाली. कथा, कविता लिहू लागलो व हा छंद जोपासलाही. असे दत्ता वालेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. सुरुवातीच्या काळात शिक्षणाअभावी कुटुंबाचा संघर्ष व पुढील आयुष्यात व्यावसायिक शिक्षणातून फोटोग्राफी या कौशल्य गुणामुळे प्रकाशझोतात येण्यासाठी अनेक संधी मिळाल्या, याचे प्रवास वर्णन त्यांनी ‘मेरी बात’ या कार्यक्रमातून करून दिली. हा जो बदल झाला तो सानेगुरुजी यांचे पुस्तक वाचनामुळे व कॅमेरा हाताळण्याचे कौशल्य संपादन केल्यामुळे झाला असे त्यांनी ठामपणे सांगितले. हा कार्यक्रम अंबाजोगाई येथील मानवलोक जनसहयोग कार्यालयातील बालकमंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सभागृहात संपन्न झाला. मनोगत सादरकर्ते दत्ता वालेकर यांचे स्वागत दत्तात्रय गावरस्कर यांनी संविधान उद्देशिका व पुस्तक भेट देऊन केले. मेरी बातचे संयोजक व्यंकटेश जोशी यांनी स्वागत गीत गायले. या कार्यक्रमासाठी आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश जोशी यांनी केले.