संस्था विचारधारा जोपासत पुढे जाण्याची प्रत्येकाची जबाबदारी – हरिशभाऊ कुलकर्णी
भाशिप्रच्या वार्षिक सभेचे अंबाजोगाईत आयोजन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी अतिशय खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणात संपन्न झाली. स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित महासभेसाठी संस्था सभासदांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. दरम्यान ७५ वर्षे आयुष्य असलेल्या संस्थेचा इतिहास मागे वळून पाहिल्यानंतर वर्तमानस्थित काळात पुढे घेवून जाणार्यांनी विचारधारा व्रत समजून काम करण्याची गरज वाटते. मिशनरी कार्यकर्ते यासाठी महत्वाचा घटक असुन सेवाभाव आणि समर्पण गरजेचे वाटते. पोट भरण्यासाठी संस्थेचा वापर केला जावु शकत नाही. मुळ विचारधारा न सोडता उत्तम नागरिक सर्वांग परी घडविण्याचं पुण्यकर्म संस्थेच्या माध्यमातून होतं. सामुहिक निर्णयाच्या आधारावर ७५ वर्षांची आदर्श परंपरा सद्यस्थितीत सुव्यवस्थित चालत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत कार्यकारिणी सदस्य हरिशभाऊ कुलकर्णी यांनी केले. ते महासभेच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
महासभेच्या प्रारंभी प्रतिमापुजन, वैयक्तिक पद्य, मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर या सभेत बीडच्या पुर्णवादी बँकेच्या चेअरमनपदी डॉ.सुभाष जोशी तर बाटुच्या कार्यकारिणीवर शासनातर्फे सदस्य म्हणुन निवड झालेले संस्था संचालक प्रविण सरदेशमुख आणि विद्यावाचस्पती पदवी मिळवणारे मुख्याध्यापक सोनवणे गुरूजी यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक अहवाल वाचनाने संस्था कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी महासभेला सुरूवात केली. यात ऍड.रोहित सर्वज्ञ, राम कुलकर्णी यांनी मांडलेले ठराव सर्वानुमते ओमच्या जयघोषात सहमत करण्यात आले. डॉ.हेमंत वैद्य यांनी आपल्यावर जबाबदारी आल्यानंतर पारदर्शक कारभार सहज संवाद, सामुहिक निर्णय या प्रक्रियेतून आपण मार्गक्रमण करीत असून सभासद सहकार्यांच्या पाठिंब्यावर जबाबदारी सक्षम पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष म्हणून या सभेत डॉ.सुरेंद्र आलुरकरांनी सभासदांना आश्वासित करताना या संस्थेचा लौकिक आणि त्या मागे कार्यकर्ता यांनी घेतलेले परिश्रम महत्वाचे असून परिवर्तनाच्या दिशेने जाताना गुणवत्ता आणि व्यवस्थापनात होणारे बदल शिवाय सर्वांच्या सहकार्याने संस्था पुढे घेवून जात असल्याचे सांगितले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी महोत्सव संस्थेच्या अजेंड्यावर असून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संस्था अमृत महोत्सवी वर्षांत देखील अनेक उपक्रमांचे आयोजन केल्याचे ते म्हणाले. महासभेच्या समारोप भाषणात हरिशभाऊ कुलकर्णी यांनी मोजक्या शब्दांत दिशादर्शक मार्गदर्शन केले. आपल्या परंपरा, उद्दिष्ट, ध्येय धोरण विषयाची उजळणी करण्यासाठीच आपण अशा निमित्ताने एकत्रित येतो. सुमारे तीनशे वर्षांपुर्वी राजमाता अहिल्यादेवीं सारख्या कर्तृत्ववान महिलेने आपल्या देशात सुशासन देताना दाखवून दिलेला सामाजिक दायित्वाचा आदर्श घेण्यासारखा असून कौटुंबिक संघर्ष करताना त्यांनी राष्ट्र आणि राज्य संकल्पना मांडली. ज्यातुन अस्मिता भाव निर्माण झाला. आपली संस्था अमृत महोत्सवात प्रवेश करीत असुन सामुहिक निर्णयाच्या आधारावर आजतागायत झालेली यशस्वी वाटचाल खर्या अर्थाने सामाजिक विश्वास पुर्णतेकडे गेल्याचे समाधान वाटते. मुळ विचारधारा न सोडल्याने रूढी, परंपरा, आदर्श वर्षांनुवर्षे चालत आले. कुठलेही सामाजिक कार्य करताना सेवाभाव, मिशनरी अंगिकारूनच करायला हवा. चाळीस हजार मुलं घडविणारी ही संस्था राष्ट्रभक्तीचे संस्कार देवून जाते. याचाच अर्थ सक्षम पिढी घडविण्याचं पुण्यकर्म आपण करतो. काळाचे बदल स्विकारायला हवे. पण, मुळ विचारधारा न सोडता पुढे जाणे महत्वाचे वाटते. संचालक अमरनाथ खुर्पे आणि शैलेष कंगळे यांनी सुत्रसंचालन केले. महासभेची सांगता कल्याण मंत्राने झाली. महासभेसाठी संयोजकांनी सर्व व्यवस्था चांगल्या केल्याचे कौतुक उपस्थित सभासद बांधवांनी केले. स्थानिक अध्यक्ष, कार्यवाह यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.