मुंबईतील पुरातन मंदिरांची जागा बिल्डरांच्या घशात, बीएमसी, राज्य शासनाच्या आशिर्वादाने ‘लाडका बिल्डर’ योजना – वर्षा गायकवाड
लाडक्या बिल्डरांसाठी गिरगाव, ताडदेव, खेतवाडीतील आठ मंदिरे पाडली, प्राचीन मंदिरांच्या संरक्षणासाठी कायदा करा.
प्राचिन मंदिरे पाडत असताना हिंदूंचे स्वयंघोषीत ठेकेदार गप्पे कसे? भाविकांच्या आस्थेशी, भावनांशी खेळू नका.
मुंबई, – भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. मुंबईतील सर्व महत्वाचे व मोक्याचे भूखंड एकाच उद्यगोपतीला कवडीमोल भावाने दिले जात आहेत. आता तर भाजपा सरकारने भ्रष्टाचाराची मर्यादा ओलांडली असून भ्रष्ट महायुती सरकार कमिशनसाठी मंदिरांच्या जागाही बिल्डरांच्या घशात घालत आहे. महाभ्रष्ट युती सरकारच्या आशिर्वादाने लाडक्या बिल्डरांनी मलबार हिल, गिरगाव, ताडदेव, खेतवाडीतील आठ ते दहा मंदिरे पाडली आहेत, असा हल्लाबोल करत प्राचीन मंदिरांच्या संरक्षणासाठी कायदा करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, विकासक कुशलराज कोठारी याने वैद्यवाडी येथील प्राचिन विठ्ठल रखुमाई मंदिर स्थलांतरीत करण्यासाठी मंदिराचे बांधकाम पाडण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक नागरिक व भाविकांनी विरोध करत आंदोलन केले, त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनने विकासकासह आंदोलनकर्त्यांना १४९ ची नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी मा. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन अंतिरम स्थगिती आदेश दिला आहे. यातील गंभीर बाब म्हणजे विकासकाच्या बाजूने निर्णय व्हावा यासाठी शासनाचे अधिकारीच प्रयत्न करत आहेत. हा प्रकार मा. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने मंदिराची प्राचिनता सिद्ध करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. न्यायालयाने केंद्रीय पुरातत्व खाते, राज्य पुरातत्व खाते, मुंबई मनपा पुरातत्व विभागाला नोटीस पाठवून १५ दिवसात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे पण मुंबई मनपाने याची फक्त दखल घेतली आहे.
वैद्यवाडी येथील प्राचिन विठ्ठल रखुमाई मंदिरचा भूखंड हा भाडेखताप्रमाणे ९९ वर्षांच्या करारासाठी दिला आहे परंतु विकासकाला अवैध्य परवानग्या देताना लिज अग्रिमेंट विचारात न घेता मालकीहक्काने दिल्याने भाडेखतामधील मुळ उद्देशाचे व अटींचे उल्लंघन झाले आहे. मिळकत मुदद्याप्रमाणे सी. एस. क्रमांक ३१३ वरील मंदिर, दिपमाळ, तुळशी वृंदावन, विहीर सोडून अन्य भुखंडावर विकसीत बांधकामे करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे परंतु शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्यासाठी नियम धाब्यावर बसवून भाविकांच्या भावनांचा अपमान केला आहे.
वैद्यवाडी येथील एकाच मंदिराचा हा प्रश्न नसून मुंबईतील जवळपास ८ ते १० मंदिरांचे भूखंड नियम तोडून विकासकांना देण्यासाठी बीएमसी व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनीच भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचे दिसत आहे. ही मंदिरे का पाडली जात आहेत याचा खुलासा राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेने करावा. भाविकांच्या भावना व श्रद्धेशी खेळू नका. मंदिराची जागा विकासकांना देताना करण्यात आलेल्या घोटाळ्यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली करून प्राचीन मंदिरे वाचवण्यासाठी जनतेबरोबर असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
खासदार प्रा. वर्षा गायकवाड, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस हिरा देवासी, जिल्हाध्यक्ष रवीकांत बावकर, कार्याध्यक्ष मंदार पवार, अश्फाक सिद्दीकी, रवी जाधव, हिना गजाली इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.