१६ ऑगस्ट रोजी डॉ. व्यंकटराव डावळे यांचा ३८ स्मृतीदिन
सकाळी ११ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापने मागे महत्त्वाची भुमिका बजावणारे व वैद्यकीय महाविद्यालयाचे पहीले अधिष्ठाता प्रख्यात सर्जन डॉ. व्यंकटराव डावळे यांचा ३८ वा स्मृतीदिन १६ ऑगस्ट रोजी आहे. या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागातील शैक्षणिक अनुशेष दुर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी अंबाजोगाई येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले व वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीची संपुर्ण जबाबदारी त्यावेळी असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन डॉ. व्यंकटराव डावळे यांच्यावर त्यांनी सोपवली. २१ फेब्रुवारी १९७५ रोजी डॉ. व्यंकटराव डावळे यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला आणि सलग ३१ ऑक्टोबर १९८३ पर्यंत त्यांनी अहोरात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले. या वैद्यकीय महाविद्यालयाचा चेहरा बनवून त्यांचे सर्वत्र नाव लौकीक कसा वाढेल यासाठी डॉ. डावळे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. व या वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतः ची ओळख निर्माण करून दिली. अंबाजोगाई आणि डॉ. व्यंकटराव डावळे हे १९६० पासून सुरु झालेले वैद्यकीय समिकरण आज ही लोकं विसरलेले नाहीत. अंबाजोगाई शहर व परिसरातील लोकांचं आयुर्मान वाढव यासाठी डॉ. व्यंकटराव डावळे यांनी केलेल्या प्रयत्नांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात त्यांचा अर्धाकृती पुतळा निर्माण करण्यात आला आहे. १६ ऑगस्ट हा त्यांचा स्मृतीदिन आहे. डॉ. व्यंकटराव डावळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी १६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या पुतळा स्थळी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास डॉ. व्यंकटराव डावळे प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.