अहमदनगर: शहरात पुन्हा गँगवॉर; घटनेची माहीती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
अहमदनगर – जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या काही वर्षातगुन्हेगारीच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अगदी अल्पवयीन मुलांपासून गँगवारच्या घटनाही घडत आहेत. काल असाच प्रकार नेवासा रोडवरील कांदा मार्केट परिसरात घडला. शहरातील दोन ‘गँग’ मध्ये वॉर झाल्याने काही तरुण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठ्या प्रमाणात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
श्रीरामपूर शहर तसेच तालुक्यातही टोळी युद्धाचा भडका उडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काल सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास नेवासा रोडवरील कांदा मार्केटच्या परिसरात दोन टोळ्यांमध्ये चांगलाच राडा झाला. यामध्ये दोन्ही बाजूकडील मंडळींनी शस्त्राचा वापर केल्याचे समजते. यामध्ये एकाचा पाय निकामी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहीती मिळताचपोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत जमावाला पांगविले. यामध्ये काही तरुण जखमी देखील झाले आहेत. या घटनेमुळे नेवासा रोडवरील कांदा मार्केट परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नव्हती.
शांततापूर्ण वातावरणाला लागली नजर
एकेकाळी पेन्शनरांचे शहर म्हणून श्रीरामपूर शहराची ओळख होती. परंतु काही वर्षापासून येथील शांततापूर्ण वातावरणाला नजर लागल्यासारखी झाली आहे.दोन्ही नद्यांमधील बेसुमार वाळूचा उपसा होऊन मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होऊ लागल्याने येथील मोठ्या प्रमाणात तरुणाई गुन्हेगारीच्या मार्गाला लागली आहे. यामध्ये श्रेयवादासाठी अनेकवेळा टोळी युध्दाचा भडकाही उडाला आहे. त्याने येथील शांततापूर्ण वातावरण खराब झाले आहे. या गंभीर परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पहाण्याची गरज आहे.