अहमदनगर : महिलेची गळा चिरून हत्या… आरोपी पोलिस ठाण्यात दाखल
अहमदनगर – शेवगाव .धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्याच्या घटनेने शेवगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस ठाण्यात दाखल झाला. आरोपी पतीचे नाव सचिन दिलीप काथवटे (वय 35, रा. ब्राम्हण गल्ली, शेवगाव) असे आहे. या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव शहरातील ब्राम्हणगल्ली येथे आरोपी सचिन दिलीप काथवटे हा पत्नी सह राहत होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती सचिन काथवटे हा स्वतः पोलिस ठाण्यात येवून हजर झाला व घटलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि. सामधान नागरे यांनी घटनस्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
पतीने टोकाची भुमिका घेत पत्नीचा गळा चिरुन हत्या केल्याच्या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.