महिला डॉक्टरने साडीने गळपास घेऊन संपवले जीवन.
सोलापूर मोहोळ येथे राहत्या घरामध्ये महिला डॉक्टरांनी छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथे घडली. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे त्या आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील मोहोळ मल्टी स्पेशालिटी हे तीन मजली हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर महिला डॉ. रश्मी बिराजदार (बीएएमएस) या पती व दोन मुलांसमवेत राहतात. दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले असता दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सद्दाम कादर मकानदार यांने संतोष बिराजदार यांना फोन करून कळविले की, घरामध्ये मॅडमने गळफास घेतला आहे. नवऱ्याने घरी येऊन खिडकीतून पाहिले असता पत्नी रश्मी हिने घरामध्ये छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतलेला दिसून आला. याबाबत मोहोळ पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहे.
प्रतिनिधी शिवराज मुगळे सोलापूर