जुगारात जप्त केलेले 7 लाख 85 हजार रुपये चक्क पोलीस अधिकार्यानेच केले गायब.
शासकीय मुद्देमालावरच कायद्याचे रक्षणकर्त्या पोलीस अधिकार्यानेच मारला डल्ला.
सोलापूर सहा वेगवेगळ्या जुगार गुन्ह्यातील वेगवेगळ्या अंमलदारांनी जमा केलेली रक्कम 7 लाख 85 हजार 969 रुपयेचा अपहार केल्याप्रकरणी सांगोल्याचे सहाय्यक फौजदार तथा तत्कालीन मुद्देमाल व नगदी कारकून अब्दुल लतिफ अमरुद्दीन मुजावर याच्यावर सांगोला पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी तथा सहाय्यक फौजदार फरार झाले असून त्याच्या तपासासाठी विशेष पथके तपासिक अंमलदार पो.नि. महेश ढवाण यांनी नेमली आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील आरोपी तथा सहाय्यक फौजदार हे सांगोला पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सन 2016 ते 2020 या कालावधीत विविध अंमलदारांनी सहा वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यातून मिळालेला मुद्देमाल रुपये 7 लाख 85 हजार 969 रुपये चा अपहार स्वत:च्या पदाचा गैरवापर करुन आर्थिक फायद्यासाठी केली. तसेच नगदी कारकून यांनी सदर रक्कम वेळोवेळी चलनाने विहित मुदतीत शासनास भरणा केली. नसल्याची फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी दिल्यावर दि.20 ऑगस्ट रोजी सदर आरोपी विरुध्द सायंकाळी 6.58 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे करीत असून आरोपीच्या शोधासाठी त्यांनी विशेष पथक नेमले आहे. या पथकाने सोलापूर शहर व अक्कलकोट तालुका पिंजून काढला आहे मात्र आरोपी अद्याप हाती लागला नाही. दरम्यान आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथक रात्रंदिवस सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या जिल्ह्यामध्ये शोध घेत आहे. दरम्यान शासकीय मुद्देमालावरच कायद्याचे रक्षणकर्त्या पोलीस अधिकार्यानेच डल्ला मारल्याने नेमका विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला असून या घोटाळ्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
एकीकडे बेकार युवकांना नोकर्या मिळत नसल्याने ते हैराण झाले असताना ज्यांना नोकरी मिळाली आहे ते मात्र शासकीय पैशाचा गैरव्यवहार करुन स्वत:चे उखळ पांढरे करुन घेत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस दलातच काम करणार्या पोलीस अधिकार्याने असे केलेल्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन बनत चालली आहे.
प्रतिनिधी शिवराज मुगळे सोलापूर