स्टील चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले…
माळशिरस नातेपुते मांडवे येथील लक्ष्मी सिमेंट पाइप्स कंपनीमधील ६५ हजाराचे ५ एम. एम. जाडीचे १ टन वजनाचे लोखंडी स्टील दि. ७ ते ८ सप्टेंबरदरम्यान सकाळी ८ वाजण्याचे सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याबाबत किरण केशव कदम (रा. कदमवाडी) यांनी नातेपुते पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली होती. यावरून नातेपुते पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तिघांना सापळा रचून ताब्यात घेत गजाआड केले. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना राकेश लोहार करीत होते.
नातेपुते पोलिस ठाण्याचे पोहेकॉ अमोल वाघमोडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील चोरटे फोंडशिरस (ता. माळशिरस) येथील फॉरेस्टमध्ये संशयितरित्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती नातेपुते पोलिस ठाण्याचे सपोनि महारुद्र परजने यांना देऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदारांनी खात्री करून फोंडशिरस येथे सापळा लावला. यामध्ये तिघांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव, पत्ता विचारला असता त्यांनी आपण सर्वजण फोंडशिरस येथील असल्याचे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केला. या गुन्ह्यात चोरीस गेलेले ६५ हजाराचे ५ एम. एम. जाडीचे १ टन वजनाचे लोखंडी स्टील व गुन्हा करतेवेळी वापरलेली दोन लाखाची टमटम असा २ लाख ६५ हजाराचा नातेपुते पोलिसांनी स्टील चोरी करणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. चोरट्यांसमवेत पोलिस अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत. मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर (अकलूज) यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलिस ठाण्याचे सपोनि महारुद्र परजने, पोहेकॉ राहुल रणनवरे, पोहेकॉ नवनाथ माने, अमोल वाघमोडे, राकेश लोहार, जावेद अतार, नितीन पन्नासे, अस्लम शेख, दिनेश रणनवरे व सायबरचे पोकों युसूफ पठाण यांनी केली.