आ.नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल करा ; पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय द्या
ऑल इंडिया पँथर सेनेचा अंबाजोगाईत जनआक्रोश मोर्चा
अंबाजोगाई (वार्ताहर)
ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आ.नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल करा, पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय द्या यासह विविध मागण्यांसाठी शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार, दिनांक १० सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व जीवन गायकवाड व अक्षय भुंबे यांनी केले. हा मोर्चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघून तो बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी सरकारच्या जनविरोधी धोरणे व कार्यपद्धती विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हालगीच्या निनादात सातशेहून अधिक महिला, युवक, पँथर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत, फलक व झेंडे घेऊन सहभागी झाले. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सदरील मोर्चाला जीवन गायकवाड, अक्षय भुंबे, नितीन गोदाम, मिनाताई लोंढे, बादल तरकसे यांनी संबोधित केले. या प्रसंगी मोर्चेकऱ्यांनी दिलेले निवेदन नायब तहसिलदार यांनी स्विकारले. सदरील निवेदनात नमूद केले आहे की, १) भाजपाचे आ.नितेश राणे यांनी एका जाहिर कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तमाम मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा जातीयवादी, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह भारत देशात दंगली घडवून सामाजिक वातावरण अस्थिर करण्याचा आ.राणे यांचा प्रयत्न असून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा नोंद करून अटक करा., २) केज पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येवता (ता.केज) येथे इयत्ता ३ री वर्गामध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांला त्याच गावातील सवर्ण दुकानदाराने चॉकलेट चोरले असा खोटा आरोप करीत झाडाला हात-पाय बांधून मारहाण केली, शिव्या दिल्या या प्रकरणी केज पोलिसांनी ऍट्रॉसिटी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तरी परंतु, याप्रकरणी बाललैंगिक आत्याचार कायद्यानुसार ही गुन्हा नोंद करून आरोपीला तात्काळ अटक करावी., ३) एका ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करून पिडीतेला तात्काळ शासकीय मदत द्या., ४) अंबाजोगाई शहर व तालुक्यात काही प्रायव्हेट फायनान्स कंपनीचे एजंट दारात बसून जाचक पध्दतीने कर्ज वसुलीसाठी महिलांना त्रास देत असल्यामुळे अशा प्रायव्हेट फायनान्सवर गुन्हे दाखल करून दादागिरीने वसुली करणाऱ्या एजंट व फायनान्स मॅनेजरवर प्रतिबंध घाला., ५) सदर बाजार, पेन्शनपुरा, फ्लॉवर्स क्वॉर्टर, लालनगर, क्रांतीनगर अंबाजोगाई भागातील स्वस्त धान्य एपीएल रेशनकार्ड धारकांचे धान्य बंद केले आहे. मुळात हे कार्डधारक एपीएल मध्ये येत नसताना त्यांची एपीएल मध्ये नोंद केली. त्यांना बीपीएल योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे, ६) दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशन मध्ये दाखल ऍट्रासिटी गुन्ह्यामध्ये फिर्यादी पिडीत ज्ञानेश्वर भाऊसाहेब पारधे, अविनाश बालाजी जोगदंड, गणेश मोहन आगळे यांना तात्काळ पोलिस संरक्षण द्या, सदरील गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा व पिडीतेला तात्काळ शासकीय मदत द्या यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. सदरील निवेदनावर ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रदेश सरचिटणीस जीवन गायकवाड, मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षय भुंबे, प्रदेश कार्याध्यक्ष अशोक घडवे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मिनाताई लोंढे, युवक जिल्हाध्यक्ष नितीन गोदाम, जिल्हा सचिव वसिमभाई शेख, जिल्हा सरचिटणीस विजयबाबा कांबळे, जिल्हा संघटक सुशिल गायकवाड, युवा नेते अमर वाघमारे, तालुकाध्यक्ष बादल तरकसे, केज तालुकाध्यक्ष समाधान बचुटे, युवा जिल्हा उपाध्यक्ष विश्वास भालेराव, युवा तालुकाध्यक्ष विशाल उर्फ शैलेंद्र बनसोडे (अंबाजोगाई), युवा तालुकाध्यक्ष राजकुमार धिवार (केज), युवा तालुकाध्यक्ष धम्मपाल भुतके (परळी), तालुका उपाध्यक्ष कमलाकर घाडगे (परळी), तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे (अंबाजोगाई), रेखाताई मस्के, युवा तालुका उपाध्यक्ष अक्षय कसबे, शहराध्यक्ष भैय्या सोनकांबळे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गृहमंत्र्यांना इशारा :
भाजपा आ.नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा, तसेच केज तालुक्यातील येवता येथे मागासवर्गीय समाजातील शाळकरी मुलाला चॉकलेट चोरल्याचे खोटे कारण सांगून त्याचे हात पाय बांधून मारहाण व शिविगाळ केली. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करावी. एका ११ वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात पीडित कुटुंबाची तक्रार घेतली नाही, अशा संवेदनशील प्रकरणात पालकमंत्री यांनी केवळ बघ्याची भूमिका घेणे योग्य नाही. याप्रकरणी ही गुन्हा दाखल करून खऱ्या आरोपीला अटक करावी. राज्यासह मराठवाडा व बीड जिल्ह्यात होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या घटना थांबल्या नाहीत. तर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू.