अहमदनगर : जागेच्या वादातून झालेल्या चत्तर खून प्रकरणात जागा मालकाला मुख्य आरोपी करावे
चंद्रकांत उजागरे यांचा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
खून प्रकरणात जागा मालकाला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अंकुश चत्तर खून प्रकरण जागेच्या वादातून झाले असताना, खूनाला कारणीभूत असणारा त्या जागेचा मालकाला मुख्य आरोपी करुन या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उजागरे यांनी केली आहे. याबाबतचा तक्रार अर्ज उजागरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिला. तर पोलीस प्रशासन या खून प्रकरणात जागा मालकाचा संबंध असताना देखील त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
उजागरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हंटले आहे की, अंकुश चत्तर खून प्रकरण रवी ॲबट यांच्या मालकीच्या जागेच्या वादातून झाला. याबाबत पोलीसांनी त्यांना चौकशीसाठी देखील बोलावले होते. ॲबट सारखे व्यवसायिक लिटीकेशन असलेल्या प्रॉपर्टी कमी किमतीत विकत घेतात. त्यानंतर त्या प्रॉपर्टीवर लोकांचे झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरतात. अतिक्रमण काढण्यासाठी त्यांना योग्य मोबदला देतात. अशा लोकांमुळे शहरातील शांतता भंग होऊन वाद निर्माण होत आहे. यातूनच खून प्रकरण घडत आहे. अशा व्यक्तींचा हस्तक्षेप दिसत नसला तरी, घटने मागचे सूत्रधार तेच असतात. ॲबट यांचे एक ते दोन वर्षापासून मोबाईलची सीडीआर तपासणी केल्यास सत्य परिस्थिती समोर येणार आहे. पैशाच्या जोरावर व राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे ही मंडळी समोर येत नाही. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे.
तसेच ही व्यक्ती राजकीय पक्षांना फंडिंग करतात व विविध खटल्यातून स्वतःला वाचवतात. या व्यक्तीचा अंकुश चत्तरच्या खूनाशी संबंध असून, त्याला आरोपी केले जात नाही. या खून खटल्याचा तपास योग्य पध्दतीने होण्यासाठी व पडद्या मागचा आरोपी समोर येण्यासाठी हा तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे देण्याची मागणी उजागरे यांनी केलेली आहे.