गाझी नगरच्या साई कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
उघड्यावर सोडलेल्या मैलामिश्रित घाण सांडपाणीमुळे पसरले साथीचे आजार व दुर्गंधीसाचलेल्या
पाण्याचा उपसा करुन ड्रेनेजलाईनची व्यवस्था करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील साई कॉलनीत काही नागरिकांनी मैलामिश्रित घाण सांडपाणी थेट उघड्यावर सोडल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले असताना तातडीने सांडपाणीची पाईपलाईन बंद करावी व साचलेल्या पाण्याचा उपसा करुन या परिसरात ड्रेनेजलाईनची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 15 मधील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर भागात नव्याने झालेल्या साई कॉलनीत ड्रेनेजलाईनची व्यवस्था नसल्याने काही कुटुंबीयांनी मागील एक ते दीड वर्षापासून मैलामिश्रित घाण सांडपाणी थेट उघड्यावर सोडून दिल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कॉलनीतील ॲमिनिटी जागेत मोठी चर खोदून व पाईप टाकून हे घाण पाणी सोडण्यात आले आहे. मागील दीड वर्षापासून या परिसरात मोठे पाण्याचे डबके साचून घाण पाण्यामुळे दुर्गंधी व डासाचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी संसर्गजन्य आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तर संपूर्ण परिसरात साथीचे आजार पसरण्यास सुरुवात झाली असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
या कॉलनीत ड्रेनेजलाईनची सुविधा नसल्याने प्रत्येक कुटुंबीयांनी सेप्टीक टँकची व्यवस्था केलेली आहे. मात्र काही कुटुंबीयांनी एकत्र येऊन दररोजचे घाण सांडपाणी सोडण्यासाठी या परिसरातील ॲम्युनिटी जागेत चर खोदून पाईप टाकला आहे. त्याद्वारे ॲम्युनिटी प्लॉटसह इतरांच्या खासगी जागेत हे घाण पाणी सोडून देण्यात आले आहे. या घाणपाणीमुळे या परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे. या घाण पाणीद्वारे डासांची पैदास होऊन रोगराई वाढत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
महापालिका प्रशासनाने त्वरीत या भागाची पहाणी करुन अनाधिकृतपणे उघड्यावर सोडण्यात आलेले सांडपाण्याचे पाईप बंद करावे, सदर भागात मोठ्या प्रमाणात जमलेल्या पाण्याचा उपसा करुन नागरिकांच्या आरोग्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्या. तसेच येथील सांडपाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ड्रेनेजलाईन टाकण्याची मागणी केली आहे. निवेदनावर हजराबी शेख, हसीना शेख, सकीना शेख, वैभव चव्हाण, जावेद बागवान, आदित्य दारकुंडे, संगिता दारकुंडे, रफिक बागवान, उजमा बागवान, योगिता टेके आदी परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.