नगर अर्बनचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक
अहमदनगर : महाराष्ट्रभर गाजलेल्या नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी चौघे अटकेत आहेत. आता बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारीया (वय ७२, रा. टाकळी ढोकेशवर) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आज सोमवारी पहाटेच्या दरम्यान ही कारवाई केली. माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी या दोघांना नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानंतर आता माजी संचालकांकडे आपले लक्ष वळवले आहे.
बँकेतील हा २९२ कोटींचा घोटाळा असून, यामध्ये शंभरहून अधिक आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी एसआयटी देखील स्थापन केली असून पोलिसांनी तत्कालीन अध्यक्ष व संचालकांवर कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे आता माजी संचालकांमध्ये खळबळ उडाली असून यातील काही आरोपी फरार झाले आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू असताना या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानेयाचे फॉरेन्सिक ऑडिट केले गेले होते. त्यानंतर घोटाळ्यात कोणाचा कसा सहभाग आहे हे स्पष्ट झाले असल्याने तपासला आता वेग आला आहे. या माहितीच्या आधारे पोलीस कारवाई होत असून इतरही काही लोकांना अटक केली जाऊ शकते असे भाकीत वर्तवण्यात येत आहे