शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या शहराध्यक्षपदी सरफराज पठाण यांची नियुक्ती
मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पठाण यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सरफराज पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. रोजगार हमी व फलसंवर्धन विकास मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शहरात आलेले मंत्री भुमरे यांच्या हस्ते शिवसेना अल्पसंख्यांक विभाग पदाधिकारीची निवड करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी पठाण यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, युवासेना शहरप्रमुख पै. महेश लोंढे, नगरसेवक भैय्या परदेशी, तालुकाप्रमुख अजित दळवी, युवा सेना तालुका प्रमुख सचिन ठोंबरे, दिगंबर गेंट्याल, परेश खराडे, अंबादास कल्हापुरे, डॉ. करण गाडे, प्रल्हाद जोशी, आनंद भागानगरे, सोमनाथ शिंदे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री संदिपान भुमरे यांनी पठाण यांना निवडीबद्दल अभिनंदन करुन पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. अनिल शिंदे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते सरफराज पठाण यांचे अल्पसंख्यांक समाजामध्ये उत्तमपणे कार्य सुरु आहे. समाजातील विविध प्रश्न सोडविताना मोठ्या प्रमाणात युवा वर्ग त्यांच्याशी जोडला गेलेला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सर्व समाजाला बरोबर घेऊन कार्य केले जात असून, सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांना सन्मानाने काम करण्याची संधी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सरफराज पठाण म्हणाले की, शिवसेना समाजात विकासाला प्राधान्य देऊन कार्य करत आहे. शिवसेनेने नेहमीच अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी व कल्याणकारी योजनांचा लाभ अल्पसंख्यांक बांधवांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.